कोंढेतड येथे चौपदरीकरणाच्या कामात ट्रेलर घुसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 02:59 PM2019-12-23T14:59:26+5:302019-12-23T15:01:02+5:30
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंढेतड व उन्हाळे चौपदरीकरणाच्या कामात अतिवेगाने जाणारा ट्रेलर रस्ताच्या मध्यभागी घुसल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
राजापूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंढेतड व उन्हाळे चौपदरीकरणाच्या कामात अतिवेगाने जाणारा ट्रेलर रस्ताच्या मध्यभागी घुसल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी अजूनही सपाटीकरणाचे काम सुरू असून, खोदाईची माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली आहे. दरम्यान, कोंढेतड येथे चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच ट्रेलरवरील चालकाच्या निष्काळजीपणामुळे तो चौपदरीकरणाच्या कामातच घुसला. रस्त्याच्या मधोमधच हा ट्रेलर घुसल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
तब्बल दोन तास हा ट्रेलर तसाच रस्त्याच्या मधोमध उभा होता. अखेर ११.३० च्या दरम्याने ट्रेलर बाजूला करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वाहनांना सावधानतेचा इशारा देणे गरजेचे आहे.
मात्र, अनेक ठिकाणी हे कर्मचारीच तैनात नसल्याने कामाच्या ठिकाणाहून वेगाने वाहने जाण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ताचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.