corona virus-रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवासी बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:42 PM2020-03-18T17:42:54+5:302020-03-18T17:44:07+5:30
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात परतीसाठी गर्दी दिसून येत आहे. तरी मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य दिसून येत आहे
रत्नागिरी : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात परतीसाठी गर्दी दिसून येत आहे. तरी मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य दिसून येत आहे.
मंगळवारी कोकण रेल्वेच्यारत्नागिरी स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या तसेच मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. परंतु त्यांच्यामध्ये कोरोना प्रतिबंधाबाबतचे गांभीर्य मात्र दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
कोकणात गेल्या काही दिवसांमध्ये शिमगोत्सव व होलिकोत्सवाची धूम होती. त्यासाठी मुंबई, पुण्यातून कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणातील त्यांच्या गावी आले होते. ते आता मुंबई, पुण्याला परतू लागले आहेत. रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातील अन्य भागांमध्येही मोठ्या प्रमाणात मुंबईकर शिमगा उत्सवासाठी आले होते. रत्नागिरी स्थानकामध्ये गेल्या चार दिवसांपासून परतीच्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
तपासणी आवश्यक
कोकण रेल्वेकडून कोरोनाबाबत रेल्वे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता कोकण रेल्वेनेही स्थानकात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याची आवश्यकता असून तशी मागणी केली जात आहे.
रत्नागिरीत अद्याप कोरोना पॉझिटीव रुग्ण आढळलेले नाहीत. काही संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर बाहेरून रत्नागिरीत येणाऱ्यांची तपासणी होणे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहे.
कोरोना दहशत
मुंबई, पुणे व राज्यातील अन्य शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने कोरोनाच्या दहशतीचे वातावण आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. मात्र, त्याचा कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर परिणाम दिसून झालेला नाही.
प्रतिबंधाचे फलक
रत्नागिरीसह कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर कोरोना या महामारीचा सामना करण्यासाठी काही सुचना देणारे फलक, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मास्क वापरण्याचा सल्लाही त्यात आहे. मात्र, रेल्वे स्थानकातील स्थिती पाहता कोरोनाबाबत प्रवाशांना भीती नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.