स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचा भाग : माेहितकुमार गर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:59+5:302021-09-27T04:33:59+5:30
खेड : पूरपरिस्थितीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उत्तम प्रशिक्षण असेल तरच आपण ...
खेड : पूरपरिस्थितीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उत्तम प्रशिक्षण असेल तरच आपण स्वतःचा आणि आपल्या परिसरातल्या सहकाऱ्यांचा बचाव करू शकतो. आपल्या गावात आपत्ती येणार नाही, नुकसान होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे मत जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी खेड तालुक्यातील अलसुरे येथे व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी खेडमधील पूरग्रस्त अलसुरे गावाला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते. गावात लाईफ जॅकेट, बोट इत्यादी साहित्य दिले जाईल, असे आश्वासनही डॉ. गर्ग यांनी यावेळी दिले. पुणे येथून खास प्रशिक्षणासाठी बोलावलेल्या आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाकडून या गावातील तरुणांना आपत्तीच्या काळात बचावकार्य कसे करावे, यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
आपत्तीच्या काळात स्वतःचा आणि आपल्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचा बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथून खास आपत्ती व्यवस्थापनचे पथक बोलावण्यात आले होते. या पथकाने पूरग्रस्त अलसुरे गावातील तरुणांना पूरपरिस्थितीच्या काळात बचावकार्य कसे करावे, यासंदर्भात मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पुरामध्ये उत्कृष्ट मदतकार्य करणाऱ्या खेडमधील रेस्क्यू टीम, विसर्जन कट्टाच्या सदस्यांचा सत्कार केला. यावेळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव उपस्थित होत्या.