पोलिओ मोहिमेच्या दिवशी गाड्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:15 PM2021-01-08T14:15:05+5:302021-01-08T14:18:45+5:30
vaccine Ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड योध्दे म्हणून काम करणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरील कंत्राटी वाहनचालकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे हे वाहन चालक पोलिओच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड योध्दे म्हणून काम करणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांवरील कंत्राटी वाहनचालकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे हे वाहन चालक पोलिओच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कंत्राटी वाहनचालक १०२ रुग्णवाहिकांमधून कोरोनाबाधित रुग्णांसह इतर रुग्णांसाठी २४ तास सेवा बजावत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना दाखल करण्यासाठीही या रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येतो.
हे कंत्राटी वाहनचालक ११,६०० रुपये मानधनावर काम करतात. प्रत्यक्षात त्यांना हातात ८,६०० रुपये मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे केली आहे.
या मागणीची दखल आरोग्य विभागाने घेतली असून, लवकरच नवीन कंत्राट वाढीव मानधनाचे असणार असल्याचे समजते. चालकांना गणेशोत्सवातही मानधन मिळाले नव्हते. दरम्यान, कोरोना काळात काम करत असताना त्यांना वेळेवर वेतन मिळणे आवश्यक आहे. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर, २०२०चे मानधन अजूनही त्यांना मिळालेले नाही. १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यावेळी मानधन न मिळाल्यास गाड्या बंद ठेवून काम बंद आंदोलनाचा इशारा या चालकांनी दिला आहे.
कोरोनाची लागण
कोरोना महामारीमध्ये काम करत असतानाच कोरोना रुग्णाशी थेट संपर्क आल्याने त्यांच्यापैकी ५ कंत्राटी वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली होती. तरीही या चालकांनी रुग्णसेवा सुरूच ठेवली होती. अतिजोखमीच्या कामातही सेवा बजावणाऱ्या या वाहनचालकांना वेतनासाठी धडपडावे लागत आहे.