बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वेवर गाड्यांचा खाेळंबा; तीन तास बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 08:56 AM2023-06-06T08:56:44+5:302023-06-06T08:57:38+5:30
कोकण रेल्वेमार्गावरील निवसर स्थानकानजीक कचरा जाळण्यात आला. त्याचा धूर जवळच असलेल्या बाेगद्यामध्ये पसरला.
लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : रेल्वे मार्गालगत जाळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर बाजूच्या रेल्वे बाेगद्यामध्ये पसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सहा ते सात एक्स्प्रेस गाड्यांचा खाेळंबा झाला. ही घटना साेमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजापूरनजीकच्या निवसर स्थानकाजवळ घडली. खोळंबलेली वाहतूक दुपारी पावणेतीनच्या सुमारास सुरळीत करण्यात रेल्वेला यश आले.
कोकण रेल्वेमार्गावरील निवसर स्थानकानजीक कचरा जाळण्यात आला. त्याचा धूर जवळच असलेल्या बाेगद्यामध्ये पसरला. याचदरम्यान मंगला एक्स्प्रेस गाेव्याच्या दिशेने जात होती. धुराची झळ बसल्याने मंगला एक्स्प्रेससह त्याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणारी दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसही अडकून पडली हाेती. या दोन गाड्यांच्या पाठोपाठ दोन्ही बाजूंनी येणाऱ्या अन्य पाच एक्स्प्रेस गाड्यांना याचा फटका बसला. बाेगद्यातील धुराचे प्रमाण कमी झाल्यानंतर गाड्या मार्गस्थ झाल्या.
या गाड्यांना बसला फटका
एर्नाकुलम-एलटीटी दुरंतो एक्स्प्रेस, मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस, मुंबईकडे जाणारी मरूसागर एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, अमृतसर-कोचुवेली एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.