चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांची बदली; प्रसाद शिंगटे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:43+5:302021-08-13T04:35:43+5:30

चिपळूण : नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांची सव्वा तीन वर्षांनंतर प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी खेड ...

Transfer of Chiplun Municipal Council Chief Vaibhav Vidhate; Appointment of Prasad Shingte | चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांची बदली; प्रसाद शिंगटे यांची नियुक्ती

चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांची बदली; प्रसाद शिंगटे यांची नियुक्ती

Next

चिपळूण : नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांची सव्वा तीन वर्षांनंतर प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी चिपळूण नगर परिषदेचा कार्यभार हाती घेतला आहे, तर डॉ. विधाते यांना सध्या प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.

डॉ. विधाते सव्वा तीन वर्षांपूर्वी पालघर नगर परिषदेतून बदली होऊन चिपळूणमध्ये आले होते. तरुण, संयमी आणि शांत तसेच स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख होती. ती ओळख चिपळूणमध्येही त्यांनी कायम ठेवली. नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रशासनामध्ये चांगला समन्वय निर्माण केला होता. सभागृहात वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन करणे, तसेच नियमबाह्य कामांना बगल देत प्रशासकीय कारभार त्यांनी हाताळला होता. प्रशासनावर पकड ठेवतानाच शिस्त आणण्याचे काम डॉ. विधाते यांनी केले. शहरातील नागरिकांसाठी आपल्या दालनाचे दरवाजे सतत उघडे ठेवून नागरिकांना थेट भेटण्याची मुभा देणारे ते पहिले अधिकारी ठरले होते.

जेवणाचा डबा बरोबर आणून कार्यालयातच जेवण करून सलग १० ते १२ तास कार्यालयीन कामकाजाचा निपटारा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शहरातील विकासकामांना चालना देतानाच रखडलेले मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. मे महिन्यातच त्यांचा ३ वर्षांचा प्रशासकीय कार्यकाळ संपला होता. परंतु, त्यांना ३ महिन्यांचा अधिक कार्यकाळ देण्यात आला होता. पेशाने डॉक्टर असलेले वैभव विधाते मूळचे पुणे येथील आहेत. आपल्या जिल्ह्यात काम करण्यासाठी ते इच्छुक होते. परंतु, त्याठिकाणी जागा नसल्याने त्यांना सध्या वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांनी येथील कार्यभार हाती घेतला.

Web Title: Transfer of Chiplun Municipal Council Chief Vaibhav Vidhate; Appointment of Prasad Shingte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.