जळगाव येथे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:00+5:302021-08-13T04:36:00+5:30
रत्नागिरी : जिल्ह्याचे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक मुगुटराव मगर यांची जळगाव येथे नुकतीच बदली झाली. अधीक्षक मगर यांच्याविषयी मुख्यमंत्री ...
रत्नागिरी : जिल्ह्याचे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक मुगुटराव मगर यांची जळगाव येथे नुकतीच बदली झाली. अधीक्षक मगर यांच्याविषयी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत खूप तक्रारी गेल्या होत्या. जिल्ह्यामध्ये त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांपेक्षा अधिक झाला होता. बऱ्याच तक्रारींनंतरही त्यांच्या बदलीविषयी हालचाल होत नव्हती. शासकीय नियमानुसार त्यांची बदली झाली.
पावसाच्या सरी
दापोली : दापोली तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पहाटे पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. गेले काही दिवस ऊन पडत असल्याने उष्मा वाढला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने हवेतील गारव्यात वाढ झाली आहे.
कोरोना अहवालाला विलंब
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात कोरोना चाचणी अहवाल उशिरा मिळत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम यांनी केला आहे. अहवाल वेळेवर प्राप्त झाले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.
जिल्हाध्यपदी रोहित भारदे
रत्नागिरी : कला-साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या राष्ट्रीय कला मंच, अहमदनगरच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी शिर्के हायस्कूलचे शिक्षक व गायक रोहित शंकर भारदे यांची निवड करण्यात आली. एका मराठी चित्रपटासाठी तीन गीतांचे रेकाॅर्डिंग करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
भातलागवड प्रात्यक्षिक
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने तेर्ये येथे विनोद मोहिते यांच्या शेतात चारसूत्री भातलागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यावेळी युरिया ब्रिकेड, हिरवळीच्या खतांचा वापर, भात पीक विमा, महात्मा गांधी ग्रामीण फळबाग योजनांची माहिती कृषी साहाय्यक पाटील यांनी दिली.
पूरग्रस्तांंना मदत
दापोली : चिपळूण महापुरातील नुकसानग्रस्तांना दापोली तालुक्यातील टेटवली येथील सरोदे समाज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पुराने सर्वच हिरावून नेल्याने संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.