बंदी असूनही आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक, पोलीस बंदोबस्ताबाबत प्रश्न चिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 02:05 PM2021-12-01T14:05:54+5:302021-12-01T14:08:12+5:30
साखरपा- मुर्शी तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही अवजड वाहने सहीसलामत जात असल्याने पोलीस बंदोबस्ताबाबतच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
साखरपा : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातून अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे साखरपा- मुर्शी तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही बुधवारी तीन वाहने सहीसलामत जात असल्याने पोलीस बंदोबस्ताबाबतच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
२२ जुलै २०२१रोजी झालेल्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळून महामार्ग चौदा दिवस बंद होता. महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. चारचाकी वाहनांना आंबा घाटातून वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. तब्बल अडीच ते तीन महिन्यांनी सहाचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली. अद्याप या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंद आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अवजड वाहनांची वाहतूकही सुरू झाल्याचे दिसत आहे.
गेले आठ दिवसात अशी वाहने मुर्शी तपासणी नाक्यावरून जात आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही ही अवजड वाहने धावत आहेत. वाहने जाण्याच्या वेळेतच पोलीस अन्यत्र जात असल्याने वाहनांची तपासणी होत नसल्याचे दिसत आहे. वाहनांची येण्याची वेळ आणि पोलीस नसण्याची वेळ योग्य साधली जात असल्याने यामागचे गौडबंगाल काय आहे, याचा तपास घेण्याची मागणी होत आहे. या वाहनांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.