एसटीच्या माल वाहतूक गाडीतून अवैध लाकडाची वाहतूक, देवरुख वनविभागाने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:08 PM2022-07-04T18:08:05+5:302022-07-04T18:09:14+5:30
रत्नागिरी-काेल्हापूर मार्गावरील साखरपा तपासणी नाका येथे देवरुख वनविभागाने ही कारवाई केली.
देवरुख : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माल वाहतूक (महाकार्गो) गाडीमधून अवैधरीत्या चिराऊ लाकडाची वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीला आहे. रत्नागिरी-काेल्हापूर मार्गावरील साखरपा तपासणी नाका येथे देवरुख वनविभागाने ही कारवाई केली. शनिवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ४०० घनफूट लाकूड जप्त करण्यात आला असून, काेणताही वाहतूक पास नसताना ही वाहतूक केली जात हाेती.
राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक गाडीतून विविध प्रकारची वाहतूक करण्यात येत आहे. त्यातून महामंडळाला चांगले उत्पन्नही मिळत आहे. महामंडळाच्या एमएच १४, बीटी ०६२६ या मालवाहतूक गाडीतून लाकडाची वाहतूक हाेत असल्याची माहिती देवरुख वनविभागाला मिळाली. ही गाडी सांगली आगाराची असून, शनिवारी रात्री साखरपा तपासणी नाका येथे ही गाडी वनविभागाने थांबवली. गाडीची तपासणी केली असता विनापरवाना लाकूड आढळले.
वनविभागाने जप्त केलेले हे लाकूड तुळसणी येथील मुकादम मिल येथून गोकुळ शिरगाव येथे जाणार होते. हा माल मुकेश पटेल (रा. सरुड, ता. शाहूवाडी) यांच्या मालकीचा असल्याचे वनविभागाने सांगितले. विनापरवाना ही वाहतूक सुरू असल्याने ही गाडी वनविभागाने ताब्यात घेतली.
ही कारवाई विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनरक्षक सचिन विलग, परिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनाधिकारी देवरुख कार्यालय तौफिक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सूरज तेली, नानू गावडे, अरुण माने, सागर गोसावी, संजय रणधीर यांनी केली. या घटनेचा अधिक तपास वनविभाग करत आहे. या घटनेत नक्की कोण आरोपी आहे हे तपासअंती समजणार आहे.