कचरा डेपो इचलकरंजीचा; त्रास मात्र ग्रामीण भागाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2016 10:25 PM2016-05-04T22:25:54+5:302016-05-04T23:49:25+5:30

जनआंदोलन लोकप्रतिनिधींकडून बेदखल : यड्राव, टाकवडे, शहापूर, आर. के. नगरचा भाग बाधित--कचऱ्याने केला कचरा

Trash Depot Ichalkaranji's; Trouble is only in rural areas | कचरा डेपो इचलकरंजीचा; त्रास मात्र ग्रामीण भागाला

कचरा डेपो इचलकरंजीचा; त्रास मात्र ग्रामीण भागाला

Next

घन:शाम कुंभार -- यड्राव--इचलकरंजी शहरातील सर्व कचरा गोळा करून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे कचरा डेपोत आणून टाकला जातो. प्रत्येक दिवशी चाळीस ट्रॅक्टरमधून ८० फेऱ्यांत सुमारे १२० मेट्रिक टन कचरा याठिकाणी येऊन पडतो. हा कचरा वाऱ्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरतो. कचरा इचलकरंजीचा, परंतु त्रास यड्राव, टाकवडे, शहापूर व सांगली नाका परिसराला सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याने नागरिकांनाच वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले, परंतु याची दखल लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.कचरा डेपोच्या पूर्वेस टाकवडे गावची हद्द आहे. उत्तरेस यड्रावचा परिसर, पश्चिमेस शहापूर व सांगली नाका व दक्षिणेस आसरानगर, सहकारनगर हा इचलकरंजीचा परिसर आहे. या कचरा डेपोत चाळीस ट्रॅक्टर-ट्रॉलीने दोन-दोन फेऱ्या कचरा भरून आणून टाकतात. प्रत्येक खेपेस सुमारे टन-दीड टन कचरा या ट्रॉलीत मावतो. असा एकूण सुमारे १२० टन दररोज संपूर्ण शहरातील कचरा गोळा होतो.कचरा शहरातून वाहून आणताना बऱ्याच ट्रॉलीवर ताडपत्री किंवा झाकण नसल्याने भरधाव ट्रॉलीतून हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावरच पडतो. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याने दुर्गंधी पसरते. तसाच उर्वरित कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. रॅक्टर-ट्रॉलीचालकांना फक्त खेपेची काळजी असते. कचरा कोठे पडतो, याकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. डेपोतील कचरा वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात उडून यड्राव, टाकवडे, शहापूर, आर. के. नगर, सांगली नाका, आसरानगर परिसरात उडून जातो. तेथील नागरिक, रहिवासी व शेतकऱ्यांना हा कचरा गोळा करून बाजूला फेकण्याचा उपद्व्याप सहन करावा लागत आहे.या कचऱ्याच्या त्रासाला वैतागून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने आंदोलनासाठी रस्त्यावर यावे लागले आहे, परंतु याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याने नागरिकांच्या समस्याही कचरा डेपोतील कचऱ्यासारख्या साठून वाढत आहे. तरीही याकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही. प्रशासनही याकडे गांभीर्याने पाहात नाही. इचलकरंजीच्या कचरा डेपोचा आणखी किती त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागणार, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर अवलंबून आहे.

कचरा डेपोत रस्त्यामध्येच ट्रॉलीतून कचरा उतरण्यात येतो. दुसऱ्या छायाचित्रात कचरा डेपोतील वाऱ्याने उडून आलेला कचरा गोळा करून टाकताना यड्राव हद्दीतील शेतकरी.
कचरा डेपो इचलकरंजीचा व त्रास आम्हाला, हा अन्याय सहन करणार नाही. नगरपालिकेने याबाबत खबरदारी घ्यावी; अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल. --- रोहित कदम, ग्रा. पं. सदस्य, यड्राव

कचरा बाहेरच पडत असल्याने दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचा बंदोबस्त करावा व तत्काळ कचरा डेपो हलवावा. =- शेखर हळदकर, ‘इनपा’चे शिक्षण समिती सदस्य

Web Title: Trash Depot Ichalkaranji's; Trouble is only in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.