गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; नाइलाजास्तव निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:42+5:302021-09-16T04:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष अन्य व्यवसायांप्रमाणे ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनाच्या परवानगीने व्यवसाय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष अन्य व्यवसायांप्रमाणे ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनाच्या परवानगीने व्यवसाय सुरू असला तरी कोरोनामुळे प्रवासी भारमान कमी आहे. गणेशोत्सवातील मोजक्याच दिवसात व्यवसाय होतो, अन्यथा उर्वरित दिवसात तुटपुंज्या उत्पन्नावरच भागवावे लागते. त्यामुळे सध्या ट्रॅव्हल्सची हंगामी दरवाढ झाली आहे.
रत्नागिरीतून मुंबई व पुणे मार्गावर ट्रॅव्हल्स गाड्या सुरू असून, निकृष्ट रस्ते व त्यामुळे देखभाल-दुरुस्ती खर्चातील झालेली वाढ. शिवाय, येताना प्रवासी भारमान नसल्यामुळे माेजक्या प्रवाशांनाच घेऊन यावे लागते. काहीवेळा तर गाडी रद्द करण्याची वेळ येते. निकृष्ट रस्त्यामुळे टायर खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. इंधन दरातील वाढीमुळे खर्चात वाढ होत असल्याने गर्दीच्या काळात तिकीट दर वाढविण्यात येतात. याहीवेळी दरात चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. नाइलाजास्तव ही दरवाढ करावी लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मुंबई, पुणे मार्गावर धावतात गाड्या
रत्नागिरी - बोरिवली
रत्नागिरी - दादर
रत्नागिरी - पुणे
रत्नागिरी - पुणे (पिंपरी-चिंचवड)
भाडे वाढले
रत्नागिरी १००० /१२००
बोरिवली
रत्नागिरी ८०० ते ९००
पुणे
निकृष्ट रस्त्यामुळे टायर खराब होण्याच्या प्रमाणात वाढ
इंधन दरातील वाढीमुळे खर्चात वाढ
कोरोनापासून आर्थिक संकटाचा करावा लागतोय सामना
मोजक्या दिवसांच्या व्यवसायामुळे तूट भरून काढणे अशक्य
उत्सवासाठी एखादा दिवस तरी घरी यावे लागते. सुटी मिळत नसल्याने वेळेवर कामावर हजर रहावे लागते. रेल्वे व बस फुल्ल असल्याने ट्रॅव्हल्सचा पर्याय योग्य ठरत असला तरी तिकीट मात्र दामदुप्पट आकारले जाते. नाइलाज म्हणून तिकीट घ्यावे लागले तरी खिशाला कात्री आमच्याच बसते. तिकीट दर निश्चित असणे गरजेचे आहे.
- जयेश सुतार, जयगड, ता. रत्नागिरी
खर्चातही वाढ
कोरोनामुळे दीड वर्षात आर्थिक संकट झेलावे लागत आहे. उन्हाळी हंगामात कोरोनामुळे गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. गणेशोत्सवातही मोजक्याच दिवसांचा व्यवसाय होतो. रस्ते निकृष्ट असल्यामुळे देखभाल दुरुस्ती खर्च, इंधन दरात वाढ, इन्शुरन्स, चालक वेतन आदी सर्व खर्च जाऊन मिळणारे उत्पन्न कमी आहे. शिवाय, येताना प्रवासी नसल्यामुळे अनेकवेळा रिकामेच यावे लागते. नाइलाजाने तिकीट दरात वाढ करावी लागते.
- बाबू चव्हाण, व्यावसायिक, रत्नागिरी
कोरोनामुळे शासन निर्णयानुसार वाहतूक बंद ठेवावी लागते. त्या काळात वाहनांची देखभाल दुरुस्ती, चालक वेतन हा खर्च भागवावाच लागतो. वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुद्धा निघत नाहीत. मोजक्या दिवसांचा व्यवसाय असतो. तिकीट दरात वाढ झाली की, प्रवाशातून ओरड होते. त्यामुळे मध्यवर्ती निर्णय घ्यावा लागतो. गाडी भरलेली असो वा रिकामी खर्च तेवढाच येतो. जीएसटी भरावाच लागतो. त्यामुळे प्रवाशांचे सहकार्य आवश्यक आहे.
- संदेश निकम, व्यावसायिक, रत्नागिरी
नाइलाजाने ट्रॅव्हल्सचा पर्याय
गणेशोत्सवासाठी गावी यावेच लागते. परंतु सुटीनंतर कामावर वेळेवर पोहोचावे लागते. रेल्वे, बसचे तिकीट मिळत नसल्याने अखेर ट्रॅव्हल्सचा पर्याय अवलंबावा लागतो. वास्तविक कोरोना संकटाचा सामना आम्हीही करीत आहोत. त्यामुळे तिकीट दर वाढविणे अयोग्य आहे. कुठेतरी नियंत्रणाची आवश्यकता आहे.
- शुभम शिंदे, गोळप, रत्नागिरी