कशेडी घाटातील प्रवास होणार सुस्साट, बोगद्याची एक मार्गिका आठ दिवसात सुरु होणार; पण..

By मनोज मुळ्ये | Published: September 4, 2023 06:02 PM2023-09-04T18:02:51+5:302023-09-04T18:04:06+5:30

डिसेंबर २०२३पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल

Travel in Kashedi Ghat will be smooth, one route of the tunnel will start in eight days | कशेडी घाटातील प्रवास होणार सुस्साट, बोगद्याची एक मार्गिका आठ दिवसात सुरु होणार; पण..

कशेडी घाटातील प्रवास होणार सुस्साट, बोगद्याची एक मार्गिका आठ दिवसात सुरु होणार; पण..

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, गणेशोत्सवापूर्वी ही एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटाचे अंतर १० मिनिटात पूर्ण करणे शक्य होणार आहे.

कशेडी घाटातील अंतर पार करण्यासाठी आता अवघड वळणांच्या कशेडी घाटातून जवळपास ३० मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच अवजड वाहनांसाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत. त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात पण या सगळ्याला आता उत्तम पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. शिवाय साडेसात किलो मीटर अंतर कमी होणार आहे.

मुंबईकडे येण्यासाठी आणि कोकणात जाण्यासाठी असे २ स्वतंत्र बोगदे आहेत. दोन किलोमीटरच्या बोगद्याला दोन्ही बाजूचे जोड रस्ते धरून हा सगळा मार्ग ११ किलोमीटरचा आहे. या बोगद्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा वेळ वाचणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कशेडी घाटातील चौपदरीकरणाचे अवघड काम या बोगद्यामुळे उत्तम पर्याय देत पूर्णत्वाकडे जात आहे. २०१८ साली या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले. डिसेंबर २०२३पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे.

महामार्ग ते बोगदा जोडणाऱ्या पुलांचे कामदेखील पूर्णत्वास गेले आहे. कोरोना कालावधीत हे काम रखडले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आता कशेडी घाटातील अवघड व धोकादायक वळणांचा प्रवास टळणार आहे. शिवाय वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

हलक्या वाहनांना प्रवेश

बोगद्याची मुंबईकडे जाणारी एक मार्गिका गणेशोत्सव काळासाठी वाहतुकीकरिता खुली करण्यात येणार आहे. सध्या यावर अवजड किंवा मोठ्या वाहनांना प्रवेश नसेल. कार, जीप, रिक्षा आणि तत्सम हलक्या वाहनांना यातून प्रवास करता येईल. गणेशोत्सव संपल्यावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास याच मार्गावरून होईल, त्यानंतर काही दिवसांसाठी हा बोगदा बंद ठेवण्यात येईल.

महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह बोगद्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. वाहतुकीच्या नियमांची चाचणी करून येत्या १० सप्टेंबरपर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. – रवींद्र चव्हाण, बांधकाम मंत्री.

Web Title: Travel in Kashedi Ghat will be smooth, one route of the tunnel will start in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.