सुब्रमण्यम् सुबू याची कन्याकुमारी ते काश्मीर भारतभर भ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:11 PM2018-08-20T16:11:14+5:302018-08-20T16:13:37+5:30
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.
आनंद त्रिपाठी
वाटूळ : एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.
सुब्रमण्यम हे ५० वर्षीय उच्चशिक्षीत गृहस्थ तरुणांनाही लाजवेल या उत्साहात २८ जुलैपासून पायी चालत आता रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर राजापूर येथे दाखल झाले आहेत. कन्याकुमारीहून २८ जुलै रोजी त्यांचा पायी प्रवास सुरु झाला असून, काश्मिरपर्यंत जवळजवळ ३६०० किलोमीटरचे अंतर ६० दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे.
हेल्ला या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेल्या सुब्रमण्यम यांना त्यांच्याच कंपनीने या अभिनव संकल्पासाठी आर्थिक मदत केली असून, एक प्रशस्त कार व आपल्या दहा सहकाऱ्यांसमवेत सुब्रमण्यम यांनी हा प्रवास सुरु केला आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर हे संपूर्ण अंतर फक्त एकटे सुब्रमण्यमच चालणार आहेत. आपल्या देशातील रस्त्यांची अवस्था, सतत होणारे अपघात व वाहतूक सुरक्षा यांच्या जनजागृतीसाठी आपली ही मोहीम असून, भारतात दररोज ४०० लोक रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच आपण ही मोहीम सुरु केल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.
चांगले रस्ते कर्नाटकातच!
आतापर्यंत आपणाला सगळ्यात चांगले रस्ते फक्त कर्नाटकमध्येच मिळाले. तिकडे रस्त्यांवर वाहनांची गर्दीही कमी प्रमाणात दिसते, असेही सुब्रमण्यम म्हणाले. त्यांच्या या मोहिमेला अनेक ह्यएन.जी.ओ.ह्णचा पाठिंबा असून, शासनानेदेखील या संकल्पनेचे स्वागत केले आहे. दररोज पहाटे ३ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ असे १२ तासात ६० ते ६५ किलोमीटर अंतर ते चालतात.
पाऊल डोनेट करा
आम्हाला या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून डोनेशन हवे आहे. परंतु, ते डोनेशन पैसे नको तर स्टेप (पाऊल) हवे आहे. त्यासाठी गुगलवरुन वन करोड स्टेप.कॉम हे अॅप घ्या व दररोज १०० ते २०० स्टेप चाला व ते आम्हाला डोनेट करा, असे आवाहन ते करतात.