‘त्या’ वृक्षाचा वटवृक्ष हाेताेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:28+5:302021-04-03T04:27:28+5:30

भिडू लागलो गगनाला सामर्थ्य आणि कर्तृत्वाने उन्नत करू देशाला...! रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे ...

‘That’ tree is a banyan tree | ‘त्या’ वृक्षाचा वटवृक्ष हाेताेय

‘त्या’ वृक्षाचा वटवृक्ष हाेताेय

Next

भिडू लागलो गगनाला

सामर्थ्य आणि कर्तृत्वाने

उन्नत करू देशाला...!

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष. ६ जून १९९६ हा प्रशालेचा स्थापना दिवस. या रौप्यमहोत्सवाच्या सोहळ्याचा प्रारंभ करताना संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक या सर्वांनाच आनंद होत आहे.

ही शाळा पूर्वी शिर्के हायस्कूलमध्ये भरत होती. परंतु, या शाळेची स्वतंत्र इमारत असावी, यासाठी त्यावेळचे कार्याध्यक्ष अरुआप्पा जोशी, कार्यवाह हळबे सर यांची इच्छा होती. त्यावेळी शहरातील प्रसिद्ध उद्योजक गंगाधरभाऊ पटवर्धन यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि शाळेची इमारत उभी राहिली.

६ जून १९९६ हा दिवस आम्हा शिक्षकांसाठी भाग्याचा दिवस. भाड्याच्या घरातून स्वतःच्या वास्तूत येण्याचा तो आनंद सोहळा सर्वांसाठीच अविस्मरणीय होता. शाळेचे सुशोभित केलेले आवार, रांगोळ्या, फुलांच्या माळा, उदबत्तीचा सुवास आणि सर्वांच्या चेहऱ्यावर असलेले स्वप्नपूर्तीचे तेज. के. जी.ची छोटी-छोटी गोड फुलंमुलं. स्वतः गंगाधरभाऊ पटवर्धन सपत्निक उपस्थित होते. तसेच अरुआप्पा जोशी, हळबे सर, बबनराव पटवर्धन, बने सर, रमेशजी कीर, प्रभाकर केतकर सर, शिल्पाताई पटवर्धन, शुभदा पटवर्धन या गंगाधरभाऊंच्या स्नुषा, केतकर मॅडम, तसेच मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग रश्मी खानोलकर, के. जी. विभागप्रमुख श्रुती सुर्वे, उषा धुपकर व इतर शिक्षक दीपप्रज्ज्वलन व उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते की, स्वतः अरुआप्पा जोशी आणि कोऑर्डिनेटर प्रभाकर केतकर सर यांनी जी. जी. पी. एस्.च्या उभारणीत विशेष मेहनत घेतली. शाळा सुरू करण्यापूर्वी काही महिने आधी सौ. खानोलकर मॅडम, जोशी मॅडम, धुपकर मॅडम, श्रुती सुर्वे मॅडम, पद्मा सावंत मॅडम, समिधा बाष्टे मॅडम, संगीत साळवी मॅडम, नीलिमा भोळे मॅडम, फौजिया नाखवा मॅडम या शिक्षकांना घेऊन रात्री अगदी आठ वाजेपर्यंत तयारीचे कामकाज चालायचे. नवीन शाळेच्या उभारणीचे व्रत घ्यायचे, तर त्यात उणिवा राहायला नकोत, हा आप्पांचा आग्रह असायचा. आपल्या शाळेसाठी राबतो ही ऊर्मी, झपाटलेपण आमच्या अंगात असायचं. अशावेळी वेळेचं भान राहातय कुणाला? विशेष म्हणजे ते झपाटलेपण अजूनही आहे, पुढेही राहील. त्यावेळी अजून एक गोष्ट म्हणजे, याच शाळेत अ‍ॅडमिशन का घ्यावी, यासाठी पालकांच्या कित्येक सभा झाल्या. त्या शेकडो लोकांना शाळेचं वेगळेपण आणि महत्त्व पटवून देण्याचं काम श्रुती सुर्वे यांनी फार जबाबदारीने पार पाडलं. कारण गंगाधरभाऊंची अशी इच्छा होती की, शहरात एक अशी शाळा असावी, की जिथे विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार तर झाले पाहिजेत व इंग्रजीवर प्रभुत्वही त्यांनी मिळवायला हवं. आज सांगताना आनंद होतो की, १९९६ ला के. जी. ते सातवीपर्यंत ४६३ विद्यार्थीसंख्या घेऊन सुरू केलेली ही शाळा २०२१ ला दहावीपर्यंत २४६५ विद्यार्थीसंख्येपर्यंत पोहोचली आहे. हा आलेख केवळ संख्येचा नसून प्रगतीचाही आहे. कारण मागील नऊ वर्षे सलग दहावीचा निकाल १०० टक्के लागत आहे. तसेच पूर्वी सहसा इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी स्कॉलरशीपला येत नसत. परंतु १९९९ ला आदित्य पावसकर याने शहरी विभागातून चाैथी व पराग इंगळे आठवी यांनी गुणवत्ता यादीत नाव पटकावले, हे शाळेला नक्कीच भूषणावह आहे. तसेच बोर्डाच्या गुणवत्ता यादीतही आदित्य पावसकरने चोविसावा येण्याचा मान पटकावला. विशेष म्हणजे स्काॅलरशीपची ही परंपरा आजही सुरू आहे, ती पण मोठ्या विद्यार्थीसंख्येने.

ही शाळा सुरू झाली तेव्हा मुख्य आकर्षणाचा भाग होता योगा व संगीत. सुरुवातीला लिमये सर, नंतर शिल्पा पटवर्धन मॅडम यांनी योगाची धुरा सांभाळली, तर आता श्रद्धा जोशी ते काम पाहतात. आमचे किती तरी विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर झळकले आहेतच, परंतु श्रद्धा जोशी यांनी योगा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. तसेच संगीत विषयाची पूर्ण जबाबदारी संगीत शिक्षक विजय रानडे यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनीही ती यथार्थपणे सांभाळली आहे, अगदी आजपर्यंत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज नावारूपाला आले आहेत. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रीय कला उत्सवात सहभागी झालेला विद्यार्थी चैतन्य परब व सर्वांना माहीत असणारी गायिका शमिका भिडे. एवढंच नव्हे, तर किरण जोशी व प्रमोद कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाच्या विविध क्षेत्रातही विद्यार्थी झळकत आहेत. राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालेला आदित्य शिंदे, राष्ट्रीय चेस संघातला पूर्वल जाधव, सुब्रतो मुखर्जी कप जिंकणारी टीम, फुटबॉल चॅम्पियन शुभम खानविलकर... असे कित्येक विद्यार्थी आज नावारूपाला आले आहेत. के. टी. एस्., एम्. टी. एस्., एन्. टी. एस्., ड्राॅईंग ग्रेड परीक्षा, प्रश्नमंजुषा यांसारख्या परीक्षेत विद्यार्थी उत्तम यश मिळवत आहेतच, शिवाय राष्ट्रीय पातळीवर तन्वी डोके हिच्या सायन्स माॅडेलची निवड झाली होती. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांच्या माॅडेलचीही निवड झाली होती.

केवळ दहा-बारा शिक्षकांनी सुरू केलेली ही शाळा आता नर्सरी ते दहावी आणि गुरुकुल विभाग मिळून सुमारे ६१ शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत, तर वीस शिक्षकेतर कर्मचारी, तीन लेखनिक, एक लॅब असिस्टंट, एक लायब्ररियन कार्यरत आहेत. अनेक शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ही मिळाले आहेत. मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण सर यांना नुकताच ‘अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ प्राप्त झाला. ‘प्रियदर्शनी इंदिरा गांधी वृक्षप्रेमी पुरस्कार’, रत्नागिरी विशेष कारागृहातील कार्याबद्दल ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यातर्फे सन्मानपत्र, तर किरण जोशी यांना लायन्स क्लबचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘बाबूराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार’ तसेच विजय रानडे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्‌य परिषदेचा ‘स्वरराज छोटा गंधर्व’ आदी अनेक पुरस्कार मिळाले. श्रुती सुर्वे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषदेसाठी निवड झाली होती. तसेच त्यांच्या स्वलिखित, दिग्दर्शित एका नाटकाला राज्यपातळीवर प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

‘इवलेसे रोप लावियले दारी,

त्याचा वेलू गेला गगनावरी...’ तशीच ही आमची श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमाची शाळा. आज या वृक्षाच्या पारंब्या चौफेर आहेत. शहरातील एक नावाजलेली शाळा म्हणून तिचं नाव घेतलं जातं. पण खरे कष्ट असतात ते त्या मुलांचे. निगुतीने ते रोपटं जोपासलं जातं, तेव्हाच त्याचा वृक्ष होतो आणि म्हणूनच उंच गेलेल्या फांद्यांनी मुळांना कधी विसरू नये. त्यांनी गाठलेली उंची आपोआप प्राप्त झालेली नाही, याचे त्यांनी भान ठेवायला हवे. पाठोपाठ येणाऱ्या नवीन शिक्षकांनी हे व्रत पुढे न्यायचे आहे, म्हणजे नक्कीच नेतील. फक्त सिंहावलोकनही करावं अधुनमधून. आज देश-विदेशात असणारी, विविध क्षेत्रात नाव कमावलेली मुले भेटतात, वाकून नमस्कार करतात, तेव्हा योग्य बीज पेरलं गेल्याचं अंतर्यामी समाधान होतं. पंचवीस वर्षांचा प्रवास एवढ्या कमी शब्दात मांडणं अवघड होतं. त्यामुळे कदाचित योगदान दिलेल्या कोणाचे नाव राहून जाण्याचा अपराध घडू शकतो. त्या सर्वांची मनस्वी क्षमा मागते. हा प्रवास असाच पुढे सुरू राहणार आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या संस्थेच्या सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या शिक्षक वर्गाकडून विद्यार्थीवर्गाला खूप खूप शुभेच्छा!

- ले. समिधा सुधीर बाष्टे

रत्नागिरी.

Web Title: ‘That’ tree is a banyan tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.