चिपळुणात सरसकट वृक्षतोड, वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:11+5:302021-05-27T04:33:11+5:30

चिपळूण : आगामी पावसाळा डोळ्यांसमोर ठेवून येथील नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यासाठी शहरातील धोकादायक वृक्षांची तोड केली ...

Tree felling in Chiplun, intense resentment among tree lovers | चिपळुणात सरसकट वृक्षतोड, वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

चिपळुणात सरसकट वृक्षतोड, वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

चिपळूण : आगामी पावसाळा डोळ्यांसमोर ठेवून येथील नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यासाठी शहरातील धोकादायक वृक्षांची तोड केली जात आहे. मात्र या वृक्षांच्या केवळ फांद्या न तोडता काही ठिकाणी सरसकट वृक्षांची तोड केली जात असल्याने पर्यावरणप्रेमी व नागरिकांमधून ओरड होत आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा फारसा तडाखा शहराला बसला नाही. काही ठिकाणी किरकोळ झाडे कोसळणे व फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या. मात्र त्याचक्षणी कर्तव्यावर असणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या पथकाने सतर्क होत वेळीच उपाययोजना केल्याने वाहतुकीला कुठेही अडथळा निर्माण झाला नाही. गेल्या दोन दिवसांपासून बुरुमतळी भागातील मुख्य मार्गावरची धोकादायक बनलेली आणि तुटलेली झाडे बाजूला करण्यासह ती छाटण्यासही सुरुवात केली आहे.

अनेक धोकादायक झाडे खासगी संस्था, सरकारी कार्यालये यांच्यासह नागरिकांच्या मालकीची असल्याने त्यांना नोटीस बजावून झाडे तोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, राजेंद्र खातू यांच्यासह सहकारी अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या उत्तम सेवेसाठी कार्यरत आहेत.

पावसाळ्यात तसेच येणाऱ्या चक्रीवादळामुळे रस्त्यालगत असणारी झाडे कोसळून, फांद्या तुटून त्यात नागरिक, व्यापारी यांच्यासह छोट्या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होते. वाहतुकीला त्याचा फटका बसतो. याबाबत गांभीर्याने विचार करून अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व पावसाळा याच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यापासूनच या पथकाने नियोजन केले. त्यादृष्टीने पावले उचलत विविध भागातील झाडे - झुडपे आणि धोकादायक झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील बुरुमतळी, भोगाळे, गोवळकोट रोड, मार्कंडीसह शहरातील काही भागातील झाडांचीही तोड केली जात आहे. नगरपरिषदेच्या पथकाने वादळात तुटलेल्या फांद्या बाजूला करण्यासह धोकादायक फांद्याही छाटून टाकल्या. शिवाय काही ठिकाणी सरसकट वृक्षतोड केल्याचे दिसून येत आहे.

........................

प्रत्येक वृक्षाची किंमत वर्षाकाठी सुमारे ४७ हजार रुपये इतकी आहे. ही बाब न्यायालयानेही मान्य केली आहे. तेव्हा धोकादायक वृक्षाच्या नावाखाली सरसकट वृक्षतोड करत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही. शहरातील बुरुमतळी व गोवळकोट रोड येथे ज्या पद्धतीने वृक्षतोड केली आहे, ते पर्यावरणाच्यादृष्टीने घातक आहे. तेव्हा नगरपरिषदेने वेळीच लक्ष देऊन सरसकट वृक्षतोड थांबवावी.

- तानू आंबेकर, चिपळूण.

Web Title: Tree felling in Chiplun, intense resentment among tree lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.