झाडे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:42+5:302021-05-19T04:32:42+5:30
सावर्डे : चिपळूण शहरातील भोगाळे ते पाग पॉवर हाऊसदरम्यान मुख्य रस्त्यावर मोठ्या झाडांच्या फांद्या अडचणीच्या होत आहेत. सध्या वादळी ...
सावर्डे : चिपळूण शहरातील भोगाळे ते पाग पॉवर हाऊसदरम्यान मुख्य रस्त्यावर मोठ्या झाडांच्या फांद्या अडचणीच्या होत आहेत. सध्या वादळी वारे वाहू लागल्याने या फांद्या रस्त्यावर तुटून पडत आहेत. पावसाळा नजीक आला असूनही नगर परिषद प्रशासनाने या झाडांच्या फांद्या छाटणीचे काम अद्याप हाती घेतलेले नाही.
बिबट्याचा वावर
राजापूर : तालुक्यातील काही भागांत पुन्हा बिबट्याचा संचार होऊ लागला आहे. तालुक्यातील तुळसवडे, गराटेवाडीत बिबट्याने वासरावर केलेल्या हल्ल्यामुळे आता पुन्हा या गावातच नव्हे तर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच आता पुन्हा बिबट्याची भीती सुरू झाली आहे.
अनेक गावे अंधारात
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड परिसराला तौउते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर तडाखा दिला. या परिसरात महावितरणचे पोल कोसळून पडले. तसेच अनेक झाडांच्या फांद्या तारांवर कोसळल्या. त्यामुळे या परिसरातील अनेक गावे सध्या काळोखात आहेत.
चाचण्यांची संख्या कमी
चिपळूण : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या सध्या कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसत आहे की काय? अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या बहुसंख्य व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कराव्यात, अशी मागणी होत आहे.
नागरिक चिंताग्रस्त
रत्नागिरी : कोरोनाबरोबरच आता म्युकरमायकोसिस या डोळ्यांच्या नव्या आजाराची भीती नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. या रुग्णांमध्ये गंभीर बुरशीजन्य संसर्ग कमी वेळात होत असल्याने कोरोनाच्या संसर्गाबरोबरच आता नागरिकांना या नव्या आजारापासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवायचे, ही चिंता सतावू लागली आहे.