देवरूखात मुदत संपलेल्या औषधांचा ढीग, मेडिकलमधील साठा असण्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 04:37 PM2018-04-28T16:37:46+5:302018-04-28T16:37:46+5:30
देवरूख शहरातील भायजेवाडी येथील निवेमाळ या ठिकाणाजवळ अज्ञात व्यक्तीने मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा बेवारसपणे टाकून दिला आहे. याचठिकाणी मोकाट जनावरे तसेच खेळण्यासाठी लहान मुले फिरत असतात. त्यांच्या तोंडी ही औषधे लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे येथील नागरिकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात संतापले असून, ही बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली आहे.
देवरूख : शहरातील भायजेवाडी येथील निवेमाळ या ठिकाणाजवळ अज्ञात व्यक्तीने मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा बेवारसपणे टाकून दिला आहे. याचठिकाणी मोकाट जनावरे तसेच खेळण्यासाठी लहान मुले फिरत असतात. त्यांच्या तोंडी ही औषधे लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे येथील नागरिकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात संतापले असून, ही बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली आहे.
मुदत संपलेली औषधे म्हणजे एक प्रकारे विषच मानले जाते. अशा मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट लावण्याची एक कार्यपध्दती आहे. ती न अवलंबल्यास ही औषधे किमान नगरपंचायतीच्या ताब्यात कचरा म्हणून देणे गरजेचे होते. हे सर्व नियम धाब्यावर बसवून अज्ञाताने सुमारे १ टेम्पो भरेल एवढा मुदत संपलेल्या औषधांचा ढीग केला आहे. झाडांच्या आडोशाला हा औषधसाठा टाकून अज्ञाताने पळ काढला आहे.
भरवस्तीशेजारीच ही शांत जागा बघून कोणालाही न कळू देता अज्ञाताने ही औषधे टाकली आहेत. या औषधांमध्ये विविध आजारांवरील गोळ्या, विविध प्रकारची बाटल्यांमधील पातळ औषधे, इंजक्शनसाठी वापरण्यात येणारी सिरीन, कापूस व अन्य प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. बुधवारी सकाळी येथील नागरिकांना हा ढीग दिसून आला. यातील काही औषधांची तपासणी केली. यात मुदत संपलेलीच औषधे टाकल्याचे दिसून आले. यामुळे येथील नागरिकांमधून चीड व्यक्त केली जात आहे.
हा कचरा तत्काळ उचलला जावा, अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे नागरिक करणार आहेत. तसेच याबाबतचे निवेदन देवरूख पोलीस ठाण्यालाही देण्याची तयारी नागरिकांनी दर्शवली आहे. या अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. टाकलेला माल हा लाखो रूपयांचा आहे. मात्र, आज त्याची किंमत नसल्याचे नागारिक बोलत आहेत.
औषधसाठा कोणाचा?
बेवारस टाकलेली ही औषधे औषधविक्री करणारा डिलर अथवा मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्याचीच असावीत, असा अंदाज तेथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, या वस्तीच्या जवळ असे कोणतेही औषध विक्रेते नसल्याने देवरूख मुख्य बाजारपेठेतूनच हा औषधी कचरा टाकल्याचे बोलले जात आहे.
मुदत संपलेली औषधे उनाड जनावरांच्या अथवा या परिसरात खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांच्या हाती लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. येथील नागरिकांनी खबरदारी म्हणून नगरपंचायतीला कळविले आहे.