रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:03 PM2022-06-28T18:03:56+5:302022-06-28T18:04:45+5:30
प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळू असा आक्रमक पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.
दापोली : तालुक्यातील जामगे-विसापूर येथील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावातील चार वाडीतील लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्काराला जलसंधारण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे आदिवासी समाजासमाेर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशान जागेजवळ पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी देण्यात आली असून, स्मशानशेड बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीची शेड बांधण्यासाठी मंजूर झालेले अडीच लाख रुपयेही परत गेले आहेत.
ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाड्यांसाठी जामगे - विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी जागा संपादित केली आहे. या संपादित जागेच्या धरणाच्या खालील बाजूला शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु, सध्या धरणाचे काम प्रगतीपथावर असून, अद्याप सांडवा, प्रवेश व पुच्छ कालव्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या धरणाच्या खालील बाजूस असलेल्या जागेमध्ये पुच्छ कालव्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
विसापूर येथील बबन बाबाजी बेंद्रे यांच्याबरोबर या कार्यालयाचे जलसंधारण अधिकारी यांच्यासमवेत दि. १६ नाेव्हेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मौजे जामगे येथील गट क्रमांक २३४ ब मधील योजनेसाठी संपादित क्षेत्र ०-६३-०० हेक्टर आर. वगळून धरणाच्या खालील बाजूला शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये क्षेत्र ०-३४-५० हेक्टर आर. स्मशानशेड बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे, असे पत्र दापाेलीतील जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागातर्फे विसापूर ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यालयातच प्रेत जाळू
प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळणार आहोत. गावात धरण बांधू देणार नाही, अधिकाऱ्यांना दगड मारू, असा आक्रमक पवित्रा जामगे येथील आदिवासी बांधवांनी घेतला आहे. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी स्वत: जामगे येथे जाऊन आदिवासी बांधवांची ही समस्या जाणून घेतली. ही समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.