..अन्यथा कार्यालयातच घुसू; बोगस आदिवासींविरोधात दापोलीत आदिवासींचा आवाज गर्जला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:49 PM2022-10-11T18:49:20+5:302022-10-11T18:51:01+5:30
'आम्हाला काही झाले तरी चालेल, आम्ही आमचा जीव द्यायलाही तयार'
शिवाजी गोरे
दापोली : बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा, सेवा संरक्षण देऊ नका, खोट्या जात प्रमाणपत्रधारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या, स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरीत प्राधान्य द्या, या मागणीसाठी बिरसा फायटर्स जिल्हा रत्नागिरी व आदिम आदिवासी कातकरी संघटनेने दापोलीत आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन केले.
आझाद मैदान दापोलीपासून मोर्चाला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे हा मोर्चा काढण्यात आहे. दापोली पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. तहसीलदार वैशाली पाटील यांनी मागण्या समजून घेतल्या व तुमच्या मागण्या शासनदरबारी वरिष्ठांपर्यंत पोहोचवते, असे आश्वासन दिले.
नगरपंचायत दापोलीमार्गे बुरोंडी नाक्यावरून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय गेटसमोर मोर्चा नेण्यात आला. तेथे आदिवासी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलन सुरू होताच कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व कुलसचिव आंदोलनस्थळी आले. विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी, कुलसचिव व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने आंदोलन थांबवण्याची विनंती केली. परंतु आंदोलनकर्ता महिला आदिवासींनी अधिकाऱ्यांना दम भरला. आता आम्ही रस्त्यावरून व गेटवरून परत जातोय, मागण्या पूर्ण न झाल्यास कार्यालयातच घुसू, मग आम्हाला काही झाले तरी चालेल, आम्ही आमचा जीव द्यायलाही तयार आहोत, असे सांगितले.
बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली हा माेर्चा काढण्यात आला. या मोर्चात बिरसा फायटर्सचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत निकम, कार्याध्यक्ष संदीप पवार, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश पवार, सचिव अक्षय निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे चंद्रकांत जाधव, दापोली तालुकाध्यक्ष विठोबा जगताप आदीसह महिला सहभागी झाल्या होत्या.