कारागृहात स्वातंत्र्यवीरांना आदरांजली, स्वतंत्र कक्षाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 05:15 PM2020-02-27T17:15:46+5:302020-02-27T17:17:08+5:30
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवारी येथील विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्र कक्षाला अनेक नागरिक आणि विद्यार्र्थी यांनी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, नागरिक यांची दिवसभर रिघ लागली होती.
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवारी येथील विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्र कक्षाला अनेक नागरिक आणि विद्यार्र्थी यांनी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, नागरिक यांची दिवसभर रिघ लागली होती.
विशेष कारागृहाच्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते, त्यालगत कारागृहाचे अधीक्षक राजेश देशमुख यांच्या प्रयत्नाने विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. यात मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून सुमारे २५ मोठे फलक बसविण्यात आले असून, त्यावर सावरकरांच्या जीवनकार्यासह स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतिंना चित्ररूपाने उजाळा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मसमर्पण दिनाचे औचित्य साधून २६ फेब्रुवारी २०१८ रोजी या कक्षाचे उद्घाटन झाले होते.
आतापर्यंत रत्नागिरीतील तसेच बाहेरील सुमारे तीन हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. ही वास्तू सावरकरांचे अलौकिक कार्य व स्वातंत्र्यलढा नव्या पिढीसमोर यावा, विद्यार्थ्यांना तो समजावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी या कक्षाला पतितपावन मंदिर विश्वस्तांनी भेट दिली.
त्याचबरोबर शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, तसेच सावरकरप्रेमी नागरिकांचीही दिवसभर दर्शनासाठी आणि हा कक्ष पाहण्यासाठी रिघ लागली होती. शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी, शिरगाव महर्षी कर्वे संस्थेच्या विद्यार्थिनी तसेच वेंगुर्ला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही या कक्षाला भेट देत सावरकरांना आदरांजली अर्पण केली.