रत्नागिरीत गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक ठरली सर्वांचे आकर्षण
By मेहरून नाकाडे | Published: September 6, 2022 12:26 PM2022-09-06T12:26:47+5:302022-09-06T12:27:19+5:30
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथील हातीसकर बंधू यांनी विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढली.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करीत असतानाच बसणी येथील हातीसकर बंधू यांनी गणेश विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढून समस्त भाविकांचे लक्ष वेधून तर घेतले शिवाय एकात्मतेचा संदेशही दिला.
रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील हातीसकर बंधू दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. नोकरी-व्यवसायानिमित्त रत्नागिरी, मुंबई येथे वास्तव्यास असले तरी गणेशोत्सवासाठी मूळ घरी एकत्र येतात. स्वतंत्र गणेशोत्सव साजरा न करता ७० जणांचे कुटूंब एकत्रित सण साजरा करतात.
भाद्रपद चतुर्थीला गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमात सर्व बालगोपाळ सहभागी होतात. गौरीगणपती विसर्जनालाच हातीसकर बंधूंच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होते. दरवर्षी नवीन संकल्पनेतून विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. दोन वर्ष कोरोना संकटामुळे शक्य झाले नव्हते. मात्र यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विसर्जनाची तिरंगा मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूकीच्या सुरूवातीला कमांडो नंतर भारताच्या नकाशासमोर भारतमाता तिरंगा घेवून त्यामागे तिरंगा घेवून युवक व त्यामागे गणेशमूर्ती व हातीसकर कुटूंबातील काही सदस्य सहभागी झाल्याने निघालेली भव्य तिरंगा मिरवणूक आकर्षण ठरली होती. भारतमातेवरील प्रेम व त्यातून एकात्मतेचा संदेश हातीसकर कुटूंबियांनी गणेशोत्सव मिरवणूकीतून दिला. ७० सदस्यांनी या मिरवणूकीत सहभागी होत, एकत्र कुटूंब पध्दतीचेही दर्शन घडविले.