कशेडी बोगद्यात तिहेरी अपघात, कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला अन् पाठिमागून दोन एसटी बस धडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 18:57 IST2024-09-06T18:54:39+5:302024-09-06T18:57:31+5:30
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कंटेनरने अचानक ब्रेक केल्याने पाठीमागून येणारी एसटी बस कंटेनरवर धडकली, तर याच बसच्या ...

कशेडी बोगद्यात तिहेरी अपघात, कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला अन् पाठिमागून दोन एसटी बस धडकल्या
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कंटेनरने अचानक ब्रेक केल्याने पाठीमागून येणारी एसटी बस कंटेनरवर धडकली, तर याच बसच्या पाठीमागून दुसरी बस धडकली. तिहेरी अपघातात कंटेनरच्या भागाचे, तर दोन्ही बसेसच्या भागाचे नुकसान झाले आहे. हा अपघात काल, गुरुवारी झाला. त्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती.
कंटेनर चालक बाबुभाई नरसिंगभाई (५६, रा. अहमदाबाद, गुजरात) हा कंटेनर (जीए ०५, टी ४२५) घेऊन गोवाच्या दिशेने जात होता. हा कंटेनर कशेडी बोगद्यात आला असता त्याने अचानक ब्रेक केला. त्यावेळी एसटी बसचा चालक प्रकाश प्रल्हाद वीरकर (५४, रा. धनगरनगर, शेगाव, जि. बुलढाणा) हे बस (एमएच १४, बीटी ४३५५) मुंबई ते मालवण अशी घेऊन जात होते. या गाडीत २५ प्रवासी होते. ही बस कंटेनरवर पाठीमागून धडकली. या बसच्या मागून बसचालक संतोष हरमकर (४५, रा. शहापूर, ठाणे) हे ठाणे ते खेड अशी बस (एमएच २० सीजी ४५६३) घेऊन येत होते. या गाडीत ४५ प्रवासी होते. ही गाडी समोरील बसवर धडकली. या अपघातात कंटेनरसह दोन्ही एसटी बसेसचे नुकसान झाले.
अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर तब्बल एक तास वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.