त्रिवेणी महिला संघातर्फे चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:19+5:302021-08-01T04:29:19+5:30
राजापूर : तालुक्यातील पश्चिम भागातील चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी महिला संघाने ‘एक घास आपुलकीचा’ या उपक्रमांतर्गत संकलित केलेली ...
राजापूर : तालुक्यातील पश्चिम भागातील चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी महिला संघाने ‘एक घास आपुलकीचा’ या उपक्रमांतर्गत संकलित केलेली मदत चिपळूण येथील पूरग्रस्तांना दिली आहे.
संघाच्या अध्यक्ष सुप्रिया गिरकर आणि सर्व संघ पदाधिकारी यांनी आपणही या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या लोकांना काही मदत करू शकतो का, यावर चर्चा करतानाच ‘एक घास आपुलकीचा’ ही संकल्पना राबविण्याचे ठरवले. त्यानुसार राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील २१ गावांमध्ये कार्यरत असलेले स्वयंसहाय्यता गट, गाव समिती आणि संघ या त्रिस्तरीय रचनेतून तत्काळ हा मेसेज सर्व महिलांपर्यंत पोहोचविण्यात आला. त्यानंतर केवळ एका दिवसात सुमारे अडीच हजार किलो तांदूळ आणि अन्य जीवनावश्यक वस्तू संकलित करण्यात आल्या. हे संकलित केलेले तांदूळ आणि अन्य साहित्य धाऊलवल्ली कार्यक्षेत्रातील एका गावात जमा करण्यात आले. तेथे या गावातील बचत गटातील महिला व स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रित केलेले हे साहित्य स्वतंत्रपणे किटच्या स्वरूपात तयार केले.
चिपळूण येथे जाण्यासाठी धाऊलवल्ली येथील कुमार गोखले यांनी केवळ इंधनाचा खर्च घेत आपला ट्रक देत स्वत:ही या मदतकार्याला सहकार्य केले. त्यांच्याबरोबरच हरेश वेलये, सुधाकर आयर, भानुदास समनाक, विनायक बाणे, गौरव बाणे, गौरव पावसकर, रोहन राणे, त्रिवेणी संघाचे व्यवस्थापक राजन लाड यांनी चिपळूण गाठले.
चिपळूण येथील गरजूंपर्यंत हे धान्य पाेहाेचविण्यासाठी सतीश कदम, संतोष कुळ्ये, खेर्डीतील परेश पंडित, मुरादपूर येथील योगेश गुडेकर, देवेश गुडेकर यांची मदत मिळाली. तर दापोली येथील प्रसाद रानडे, गोवा येथून आयसीआयसीआय बँकेच्या दीपाली मयेकर, चिपळूणच्या रंजना सावर्डेकर, नरेंद्र मोहिते, जितेंद्र खामकर, पंढरीनाथ आंबेरकर, अविनाश महाजन, सचिन देसाई, मुंबईतील पोलीस निरीक्षक दिलीप काळे, संमोहन तज्ज्ञ महेंद्र गवाणकर, शीतल शिरीष पंगेरकर, दीक्षा प्रितेश देवळेकर, पुणे येथून चैतन्य संस्थेचे पदाधिकारी, त्रिवेणी संघाचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.