आंबा बागायतदारांना पुणे पोलिसाचा त्रास

By Admin | Published: May 24, 2017 06:09 PM2017-05-24T18:09:08+5:302017-05-24T18:09:08+5:30

राजापुरातील बागायतदाराचे खोके घेतले काढून, कष्टाच्या हापूसवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

The troubles of the municipal corporators of Pune corporation | आंबा बागायतदारांना पुणे पोलिसाचा त्रास

आंबा बागायतदारांना पुणे पोलिसाचा त्रास

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी : दि. २४ : स्वमालकीचे आंबे घेऊन पुण्यात वितरणासाठी जाणाऱ्या राजापूर येथील एका बागायतदाराला पुणे येथील एका महिला ट्रॅफिक पोलिसाने चांगलाच त्रास दिल्याची घटना घडली. आधी आंब्याचे तीन खोके गाडीतून काढून घेणाऱ्या या महिला पोलिसाकडून त्याने खुबीने दोन खोके परत घेतल्यानंतर गाडीत ‘फर्स्ट एड कीट’ नसल्याचा आक्षेप घेत ६00 रूपयांचा ‘दंड’ करून त्या पोलिसाने आपले ‘कर्तव्य’ निभावले.

सदरची घटना सिंहगड रोडवर एका पुलानजीक घडली आहे. स्वत:च्या मालकीचे आंबे नेणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून नियमितपणे त्रास दिला जात असल्याने आता याबाबत जिल्हा बागायतदार संघाच्या माध्यमातून याची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

राजापूर येथील एक बागायतदार स्वत:च्या बोलेरो जीपमधून हापूस आंबा घेऊन पुणे येथे जात होता. सिंहगड उड्डाणपूल येथे एका महिला वाहतूक पोलिसाने त्यांची गाडी अडवली. तुम्ही खासगी गाडीतून करत असलेली आंबा वाहतूक बेकायदेशीर आहे, तुम्ही सिग्नल मोडला आहे, त्यामुळे तुम्हाला २0 हजार रूपये दंड भरावा लागेल आणि तुमचे लायसन्स रद्द करावे लागेल, असे त्या महिला पोलिसाने बागायतदाराला सांगितले.

चुकीने सिग्नल मोडला गेला असेल तर त्यासाठीचा दंड भरायची आपली तयारी आहे. मात्र स्वत:च्या बागेतील आंबा, स्बत:च्या वाहनातून घेऊन जाणे बेकायदेशीर नाही. त्यामुळे दंड कमी करावा, अशी विनंती त्या बागायतदाराने केली. त्यावर त्या महिलेने प्रथम दहा हजार आणि मग पाच हजारांची मागणी केली.


एवढी रक्कम देणे अशक्य असल्याचे त्या बागायतदाराने सांगितल्यानंतर त्या महिला पोलिसाने आंब्याचे पाच खोके देण्याची सूचना केली. हे खोके ठराविक लोकांकडे वितरित करावयाचे आहेत, त्यात जादा खोके नाहीत, असे त्याने सांगताच त्या पोलिसाने अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ करत गाडीतून तीन खोके स्वत:च काढून घेतले. संबंधित बागायतदाराने उर्वरित खोके पुणे येथे वितरित केले. मात्र झालेला प्रकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे तो पुन्हा त्या महिला पोलिसापर्यंत गेला. त्याने तिला सांगितले, ‘‘हे आंबे कृपया तुमच्या निष्पाप मुलांना खाण्यासाठी देऊ नका. मी आणि माझ्या कुटुंबियांनी वर्षभराच्या मेहेनतीने हे आंबा पीक घेतले आहे. तुम्ही आमचे अन्न आमच्यापासून हिसकावून घेतले असल्यामुळे तुम्हाला ते लाभणार नाही.’’ त्याने एवढे सांगितल्यानंतर त्या महिला पोलिसाने अत्यंत गलिच्छ शिव्या देत आंब्याचे दोन खोके परत आणून दिले. तिसरा खोका साहेबांनी नेला असल्याचेही त्या महिला पोलिसाने सांगितले.

त्यानंतर संबंधित बागायतदार तेथून निघाला आणि त्यानंतर अर्ध्या तासातच त्याला ‘गाडीमध्ये फर्स्ट एड कीट नाही, सिग्नल तोडला आणि गाडी वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी उभी केली आहे,’ अशा तीन कारणांसाठी ६00 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर झळकला.

संघाकडे दाद मागणार

पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये आंबे घेऊन जाणाऱ्या बागायतदारांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. अशा बागायतदारांचा स्वत:च्या बागायतीच्या सात-बारा उतारा जवळ असणे आवश्यक आहे. सात-बारा उतारा आहे, त्यांना पोलिसांनी त्रास देणे अपेक्षित नाही. पण तरीही अशा घटना अनेकदा घडत असल्याने त्या रोखण्यासाठी जिल्हा आंबा बागायतदार संघाकडे दाद मागितली जाणार आहे.

Web Title: The troubles of the municipal corporators of Pune corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.