कशेडी घाटात ड्रम नेणारा ट्रक उलटला; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:29 AM2021-05-22T04:29:27+5:302021-05-22T04:29:27+5:30
खेड : रसायन भरलेले ड्रम घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटून पलटी झाल्याची घटना मुंबई-गोवा ...
खेड : रसायन भरलेले ड्रम घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटून पलटी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शुक्रवारी (दि. २१ रोजी) सकाळी ८.१५ वाजता घाटातील कशेडी आंबा येथे घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा जाणारा ट्रक (एमएच ०६ बीडब्लू ०२१५) चालक सूरज चंद्रकांत शेडगे (३०, रा. भांडूप, कोकणनगर) हा ट्रकमध्ये कपडे बनविण्याचे क्रॉस आर-४००, कॉलॉरीन -६०० व दिस्पेर-एक्स या रसायनाने भरलेले ड्रम घेऊन गाेव्याकडे जात हाेता. कशेडी घाटात आंबा स्टॉपजवळ एका अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस उलटला. अपघातामध्ये ट्रकमधील रसायनाचे ड्रम खाली पडून फुटल्याने रसायन रस्त्यावर पसरले हाेते. मात्र, हे रसायन ज्वलनशील अथवा घातक नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार यशवंत बोडकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अपघातामध्ये चालक सूरज शेडगे याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून, त्याला कळंबणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रक रस्त्याच्या बाजूला पडल्याने वाहतुकीला काेणताच अडथळा झालेला नव्हता.
----------------------------
खेड तालुक्यातील कशेडी घाटात ट्रक उलटून अपघात झाल्याने रस्त्यावर रसायन पडले हाेते.