ट्रॅक्सवर ट्रक कोसळून दोघी ठार
By admin | Published: April 5, 2016 01:02 AM2016-04-05T01:02:49+5:302016-04-05T01:02:49+5:30
संगमेश्वरातील घटना : तीन महिला जखमी; सोनवी पुलानजीक अपघात
देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरातील सोनवी पुलानजीक माभळे येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रॅक्सवर भरधाव जाणारा ट्रक पलटी झाल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या. तर तीन महिला जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला. मृतांमध्ये विजया विजय पांचाळ (४५) आणि शांती रामचंद्र पांचाळ (दोघीही येगाव - ढोकबाववाडी, ता. चिपळूण) यांचा समावेश आहे.
चिपळूण तालुक्यातील येगाव ढोकबाववाडीतील राजू पांचाळ यांचे सासरे मृत झाल्याने पांचाळ कुटुंबीय चिपळूण येगाव येथून सकाळी १०.३० वाजता वेळवंड येथे जाण्यास निघाले होते. रूपेश सीताराम मयेकर (कुटरे) याची ट्रॅक्स भाड्याने करून सातजण निघाले होते.
संगमेश्वरातील सोनवी पुलाच्या पुढील बाजूस माभळे येथे त्यांनी ट्रॅक्स रस्त्याच्या बाहेर मोकळ्या जागेत उभी केली होती व दोघेजण मृताला हार आणण्यासाठी ट्रॅक्समधून उतरले. याच दरम्यान मुंबईहून गोव्याकडे निघालेला भरधाव ट्रक (एमएच-०४-डीएस-२९०१) या ट्रॅक्सवरच पलटी झाला. हा ट्रक बाळाजी शिवाजी पवार (भिवंडी) चालवत होता. यामुळे ट्रॅक्सचा चुराडा झाला. अपघातास कारणीभूत ट्रकमध्ये मैदा, आटा अशी पोती भरलेली होती. ट्रकच्या मागील हौद्यासह पोती ट्रॅक्समध्ये बसलेल्या पांचाळ कुटुंंबीयांच्या अंगावर पडली. पीठाच्या गोण्यामध्ये घुसमटल्यामुळे विजया आणि शांती या दोन महिलांचा जागीच मृत्यू ओढवला. ट्रकचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
ट्रॅक्समध्ये बसलेले रसिका राजू पांचाळ, शैलेश गणेश जोंधळे आणि सुनंदा अनंत पांचाळ हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. जखमी पांचाळ कुटुंबीयांचे प्राण वाचविण्यास ग्रामस्थांचे शेकडो हात पुढे आले होते.
संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये ट्रॅक्सचालक रूपेश मयेकर याने तक्रार दिली आहे. अपघातामुळे दोन तासांपेक्षा अधिक वेळ वाहतूक ठप्प होती. क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्स व ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृतांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यकांत लोटे, आशिष शेलार, बाबा कदम, सुनील शिंदे यांनी पंचनामा केला. संगमेश्वर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, सायंकाळपर्यंत चौकशी सुरू होती. (प्रतिनिधी)
ट्रॅक्सचालक बचावला
ट्रॅक्स उभी करून पांचाळ बंधू हार आणण्यासाठी गेले होते. याचवेळी ट्रॅक्सचालक रुपेश मयेकर हा ट्रॅक्सपासून काही अंतरावरच बाजूला उभा असल्याने तो बालंबाल बचावला आहे. आपण भरधाव ट्रक पाहिला आणि नियंत्रणात न आलेला ट्रक ट्रॅक्सवर पडताना पाहिल्याचे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.