ट्रकची चार वाहनांना धडक, एक ठार, हातखंबा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 01:31 PM2020-11-23T13:31:28+5:302020-11-23T13:33:18+5:30
accident, truck, car, ratnagirinews कोल्हापूर येथून रत्नागिरीत साखर घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने तीन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ तर १० जण जखमी झाले़. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला़. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
रत्नागिरी : कोल्हापूर येथून रत्नागिरीत साखर घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने तीन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ तर १० जण जखमी झाले़. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला़. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या अपघातात ठार चालेल्या दुचाकी चालकाचे नांव सतीश कोंडीबा डांगरे (४०, रा. गणेशनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे आहे. ट्रक चालक अजिजुल्लाह असेमोहम्मद (३६, रा. संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) हा साखर घेऊन (एमएच०८-डब्ल्यू-३९४५) कोल्हापूर ते रत्नागिरी असा घेऊन येत होता. हातखंबा पुलावर गाडी आली असता ट्रकवरील ताबा सुटल्याने कोल्हापूर-गणपतीपुळे येथे निघालेल्या तीन दुचाकी आणि एका कारला एका पाठोपाठ एक धडक दिली.
या अपघातात तिन्ही दुचाकींवर प्रत्येकी तीनजण बसून प्रवास करत होते. अपघातात मृत्यू झालेले सतीश डांगरे यांची पत्नी जयश्री डांगरे (३५), मुलगी ऋतुजा सतीश डांगरे (१५) हे प्रवास करत होते. तर अन्य एका दुचाकीवर दुचाकी चालक सोमनाथ कोंडिबा डांगरे (४२), अर्पिता सोमनाथ डांगरे (१५), शुभांगी डांगरे (४०), तर तिसऱ्या दुचाकीचा चालक श्रीशल राजू डांगरे (२१), शोभा राजू डांगरे (५१), प्रिया राजू डांगरे (२३) हे प्रवास करत होते.
हातखंबा बाजारपेठेत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने मारूतीझेन कारला पाठीमागून ठोकर दिली. त्यात कारचालक प्रदीप बाळकृष्ण पटवर्धन (३४, रा. कासारवेली, रत्नागिरी) व त्यांचे वडील बाळकृष्ण पटवर्धन (७२) हे जखमी झाले़. त्यानंतर ट्रकने तीन दुचाकींना धडक देऊन अपघात केला. या अपघातात तीन दुचाकी, कार आणि त्या ट्रकचे नुकसान झाले़ अपघातानंतर सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हातखंबा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.
पर्यटनासाठी दुचाकीवरून
पर्यटनस्थळ खुली झाल्याने अनेकजण कोकणात दाखल होत आहेत. इचलकरंजी येथील डांगरे कुटुंबिय दुचाकीवरून गणपतीपुळे येथे चालले होते. मात्र, साखर घेऊन येणारा ट्रक त्यांच्यासाठी काळ बनून आला. या अपघातामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले.