कामथे घाटात ट्रकची एसटी बसला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:59+5:302021-08-26T04:33:59+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा मार्गावरील कामथे घाटादरम्यान ट्रकने मागून एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. अपघातानंतर ट्रक चालक ...
चिपळूण : मुंबई-गोवा मार्गावरील कामथे घाटादरम्यान ट्रकने मागून एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. या प्रकरणी ट्रक चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सलमान इसराक अहमद (२२, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत फिर्याद शीतल शिवाजी पाटील (३६, सांगली) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस येरडव-राजापूर ते मुंबई प्रवाशांसह घेऊन येत होते. यावेळी त्याच्या उजव्या बाजूस हवा भरण्यासाठी एक ट्रक थांबविला होता. त्याच्या पाठीमागून दुसरा ट्रक एसटी चालकाला थांबण्याचा इशारा करून ओव्हरटेक करत होता. मात्र, एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूस थांबवली असता, पाठीमागून आलेल्या ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने एसटी बसच्या पाठीमागील बाजूस ठोकर दिली.
या अपघातात वाहकाला किरकोळ दुखापत झाली असून, एसटी बसचे नुकसान झाले आहे. हा अपघात घडल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. या प्रकरणी शीतल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.