बुरंबी येथे वृक्ष कोसळून वाहतूक तीन तास ठप्प
By admin | Published: August 31, 2014 11:04 PM2014-08-31T23:04:00+5:302014-08-31T23:41:46+5:30
प्रवाशांचे हाल : महामार्गावर वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होतेय वाढ
देवरुख : संगमेश्वर - देवरुख राज्य मार्गावर बुरंबी हनुमान मंदिरसमोर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या वृक्षामुळे पहाटेपासून हा मार्ग सुमारे तीन तास ठप्प होता. यामुळे मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. वृक्ष उन्मळून कोसळण्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने प्राणहानी टळली आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. कोसुंब या ठिकाणी वडाचे झाडदेखील रस्त्याच्या बाजूलाच कोसळून पडले होते. मात्र, त्याचा अडसर होत नव्हता.
संगमेश्वर - देवरुख मार्गावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बुरंबी मुचरी माळ तिठ्याजवळ व हनुमान मंदिराच्या समोर जांभळीचा वृक्ष रस्त्याच्या मधोमध पडला होता. यामुळे रात्री मुंबईहून देवरुख, साखरपा, देवडे या नेहमीच्या गाड्या संगमेश्वर बसस्थानकात काही काळ थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या कोळंबेमार्गे कोसुंब व्हाया सोडण्यात आल्या. यामुळे संगमेश्वर ते कोसुंब या दरम्यानच्या मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले.
वृक्ष कोसळल्याची कोणत्याच शासकीय यंत्रणेला माहिती नसल्याने सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी वृक्ष हटवून मार्ग मोकळा केला. तोपर्यंत कोणतीही यंत्रणा घटनास्थळापर्यंत पोहोचली नव्हती. आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे, अशी शेखी मिरवणाऱ्या शासकीय यंत्रणेचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे.
मात्र, पहाटे घटनास्थळी जावून मार्ग मोकळा करुन वाहतूक सुरळीत करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना खोळंबलेल्या प्रवाशांनी धन्यवाद दिली. या वृक्षामुळे संगमेश्वरहून देवरुखकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची मोठी रांग लागली होती. सुमारे तीन तास हा मार्ग ठप्प होता. त्यामुळे होणाऱ्या खोळंब्यामुळे प्रवाशी हैराण झाले होते. (प्रतिनिधी)