पोलिस असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 03:20 PM2019-03-19T15:20:02+5:302019-03-19T15:21:35+5:30
पोलीस वेश परिधान करून व राजापूर पोलीस स्थानकात पोलीस हेडकाँस्टेबल असल्याचे सांगून शहरातील एका सुवर्णपेढीवर वस्तू खरेदी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तोतया पोलीसाला राजापूरातील जागरूक व्यापारी व नागरिकांनी पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
राजापूर : पोलीस वेश परिधान करून व राजापूर पोलीस स्थानकात पोलीस हेडकाँस्टेबल असल्याचे सांगून शहरातील एका सुवर्णपेढीवर वस्तू खरेदी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तोतया पोलीसाला राजापूरातील जागरूक व्यापारी व नागरिकांनी पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकरणी पोलीसांकडून या तोतया पोलीसाची चौकशी सुरू होती. मात्र उशीरापर्यंत पोलीसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.
शहर बाजारपेठेत सोमवारी पोलीसी वेष परिधान करून एक इसम फिरत होता. बाजारपेठेतील नार्वेकर ज्वेलर्समध्ये तो काही सोन्याच्या वस्तु खरेदी करण्यासाठी गेला. आपण राजापूर पोलीस स्थानकात यावेळी मालक प्रशांत नार्वेकर यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबती केली.
त्यावेळी तो काहीसा गोंधळला व त्याने तात्काळ नार्वेकर यांच्या दुकानातून काढता पाय घेतला. याबाबत नार्वेकर यांनी राजापूर पोलीसांत दुरध्वनी करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर नार्वेकर व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी तात्काळ त्या तोतया पोलीसाचा पाठलाग केला.
दरम्यान, एस टी डेपोत जाऊन वेश बदलून हा तोतया पोलीस एका खासगी आराम बसने फरार होण्याच्या तयारीत होता. नार्वेकर यांनी त्याला तात्काळ ओळखले.
याबाबत माहिती मिळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, माजी नगरसेवक विजय गुरव, संतोष सातोसे, सुनिल सातोसे, प्रशांत जाधव, पिंटू शिंदे यांसह नार्वेकर यांनी त्याला पकडून राजापूर पोलीसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत राजापूर पोलीसांकडून या तोतया पोलीसाची चौकशी सुरू होती. अशा प्रकारे तोतया पोलीसाच्या वावरामुळे राजापूर शहरात खळबळ उडाली असून पोलीसांनी या अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी होत आहे.
काही दिवसापुर्वी एका अल्पवयीन चोरट्याला राजापुरातील जागरून नागरिक व तरूणांनी पकडून राजापूर पोलीसांच्या स्वाधीन केले होते. त्याने केलेल्या चोरीची कबुलीही दिली होती. मात्र तो अल्पवयीन असल्याने व त्याच्या पालकांनी माफी मागितल्याने पोलीसांनी त्याला सोडून दिले होते.