जिल्ह्यात पक्षांतराची त्सुनामी

By admin | Published: October 26, 2016 12:13 AM2016-10-26T00:13:37+5:302016-10-26T00:13:37+5:30

निवडणूक धूमशान : रत्नागिरी, राजापूर, चिपळुणात ‘आऊटगोर्इंग’, ‘इनकमिंग’चा वेग वाढला

Tsunami of parties in the district | जिल्ह्यात पक्षांतराची त्सुनामी

जिल्ह्यात पक्षांतराची त्सुनामी

Next

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २४ ते २९ आॅक्टोबर या सहा दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रीक्रया पूर्ण होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. खात्री असूनही उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण संतापले असून, पक्षांतराचे ‘धुमशान’ सुरू झाले आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूणमध्ये पक्षांतराची त्सुनामी सुरू झाली असून, येत्या काही दिवसात ‘आऊटगोर्इंग’, ‘इनकमिंग’चा वेग वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात रत्नागिरी व चिपळूण या ब वर्ग नगरपरिषद, राजापूर, खेड या क वर्ग नगरपरिषदांमध्ये तसेच दापोली नगरपंचायतीसाठी येत्या २७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सर्वच पक्षांकडून होत आहे. विद्यमान नगरसेवक असलेल्या अनेकांना आरक्षण पडल्याने निवडणूक रिंगणात उतरणे अवघड बनले आहे. त्यांच्याकडून दुसऱ्या वॉर्डची चाचपणी केली जात आहे. मात्र, त्या वॉर्डवर अन्य कार्यकर्त्यांचा दावा असल्याने दुसरा वॉर्डही मिळणे अशक्य झाले आहे.
आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना फटका बसला आहे. तसेच गेल्या पाच वर्षातील विकासकामांचा अहवाल समाधानकारक नसल्याने काही नगरसेवकांना त्यांच्या पक्षाकडून ‘नारळ’ देण्यात आला आहे. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. त्यांनी दुसऱ्या पक्षांचे दरवाजे ठोठावण्यास सुरूवात केली आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक इच्छुक शिवसेनेत आहेत. रत्नागिरीसाठी शिवसेनेने पहिली १५ उमेदवारांची यादी खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रत्नागिरी येथे पत्रकारपरिषदेत जाहीर केली. त्यामध्ये जुन्या जाणत्या अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश करतानाच काही नवख्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी मिळालेली नाही. दुसऱ्या यादीत त्यांची नावे आली नाहीत, तर बंडखोरी किंवा पक्षांतर असे पर्याय स्वीकारावे लागतील, अशी चर्चा सेनेतील इच्छुकांमध्ये सुरू आहे. दुसरीकडे सेनेतील अशा उमेदवारांना भाजप किवा राष्ट्रवादीतूनही उमेदवारी मिळेल, अशी स्थिती असल्याने पक्षांतराची शक्यता वाढली आहे.
रत्नागिरी भाजपमध्येही अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाबा बार्इंग तसेच शहर अध्यक्ष संजय पुनसकर यांनी भाजपला राम राम केला असून, शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपची ताकद कमी होणार असल्याची चर्चा आहे. बार्इंग तसेच पुनसकर यांच्याप्रमाणेच भाजपमधील आणखी काही नाराज नेते व कार्यकर्तेही पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सेना, भाजप, कॉँग्रेस व राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. राजापूर नगरपरिषदेत सध्या कॉँग्रेसची सत्ता आहे. त्यांचे १० नगरसेवक आहेत. तसेच कॉँग्रेसच्या मीना मालपेकर या नगराध्यक्ष आहेत. २७ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर शहरातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्ष मीना मालपेकर यांचे पती जितेंद्र मालपेकर यांनी कॉँग्रेसला राम राम करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सेनेमधून त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे, तर कॉँग्रेसचे रवींद्र बावधनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनाही भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. राजापूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या तीन - चार दिवसात राजकीय उलथापालथी अधिक होतील, असा अंदाजही व्यक्त होत आहे.
चिपळूण नगरपरिषद अर्थात चिपळूण शहर हे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र समजले जाते. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या सुरेखा खेराडेना सेनेने नकार दिल्याने खेराडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. शहर विकास आघाडीचे मोहन मिरगलही सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे चिपळुणातही पक्षांतराची हवा जोरात आहे.

 

Web Title: Tsunami of parties in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.