ढगाळ वातावरणामुळे हापूसवर तुडतुड्याचा धोका
By admin | Published: December 31, 2014 09:51 PM2014-12-31T21:51:09+5:302015-01-01T00:17:02+5:30
किडीच्याही प्रादुर्भावाची शक्यता : फवारणीच्या खर्चाने बागायतदार चिंतेत
रत्नागिरी : सध्या हवेत मोठ्या प्रमाणात गारठा असून, तापमान १७ अंश सेल्सिअस इतके खाली आले आहे. परंतु गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे आंब्याच्या मोहोरावर तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून, फवारणी खर्च वाढला आहे.
हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाने नवीन वर्षातच हापूसच्या धोक्याची घंटा वाजली आहे. हापूसला मोहोर लागण्यापूर्वीच तक्रारी सुरु होत असल्याने हापूसचे पीक यंदाही कमी येणार की काय? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. वारंवार होणाऱ्या या बदलामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडला अहे.
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यासह रत्नागिरीचा पारा घसरला आहे. किमान १७ अंश सेल्सिअस, तर कमाल २९ अंश सेल्सिअस तापमान आहे. दिवसादेखील थंड वारे वाहात असल्यामुळे लहान-थोर मंडळी थंडीने गारठली आहेत. यावर्षी मुळातच थंडी उशिरा सुरू झाल्याने आंब्याची मोहोर प्रक्रिया उशिरा सुरू झाली. अद्याप मोहोर प्रक्रिया सुरू आहे.
बहुतांश झाडांना फळधारणा झाली आहे. वाटाणा व सुपारीएवढी फळधारणा झाली आहे. १५ अंश सेल्सिअस इतके तापमान पोषक आहे. परंतु १५ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान नीचांक आले तर मात्र पुनर्माेहोराचा धोका वाढू शकतो. शिवाय फळधारणा थांबण्याबरोबर वाढीचा वेग मंदावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, कल्टार घातलेल्या झाडांना पुनर्माेहोर सुरू होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हापूसवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.
वातावरण ढगाळ असल्यामुळे मोहोरावर तुडतुडा, कीडसदृश रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कीड नियंत्रणासाठी मोहोर व फळधारणेच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची फवारणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी आता वाढीव खर्चाची तरतूद करावी लागणार असल्याने बागायतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)