तुळशी, खवटीचा पाणी प्रश्न मिटणार
By admin | Published: May 9, 2016 12:17 AM2016-05-09T00:17:59+5:302016-05-09T00:47:41+5:30
शाम गवळी : ‘जिंदल’ने उचलली गावांची जबाबदारी; दोन वाड्यांमध्ये विहिरी बांधणार--लोकमतचा प्रभाव
खेड : तालुक्यात सध्या पाणीटंचाईचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’ने दि. ५ मे २०१६ रोजी ‘दुष्काळ दाह’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिंदल कंपनीने तुळशी आणि खवटी गावातील पाण्याच्या प्रश्नाची जबाबदारी उचलली आहे.
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा अद्याप दुष्काळ आहे. नद्या, नाले आणि डोह आटल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्ह्यात पहिला टँकर धावतो तो खेड तालुक्यातील तुळशी गावच्या कुब्जवाडीत आणि खवटी गावच्या धनगरवाडीत! या दोन वाड्यांतील वस्तीला पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता आता जिंदल समुहाने जबाबदारी घेतली आहे. काही दिवसातच या दोन वाड्यांमध्ये विहिरी बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तुळशी कुब्जवाडीतील ग्रामस्थ शाम गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कंपनीच्या या उपक्रमामुळे येथील ग्रामस्थांनी धन्यवाद दिले.
खेड तालुक्यातील पारंपरिक जलस्रोत आटल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गावातील जुन्या विहिरी आटल्या. नव्या विंधन विहिरींना पाणीच नसल्याने सध्या त्या कोरड्या ठाक आहेत. सरकारी योजनांतून खोदल्या जाणाऱ्या नव्या विंधन विहिरींना पाणीच लागत नसल्याने लाखो करोडो रुपयांचा चुराडा होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात ३४ गावे आणि ६१ वाड्या टंचाईग्रस्त आराखड्यात आहेत. यातील १९ गावे आणि २४ वाड्यांना सध्या केवळ २ शासकीय आणि एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी तालुक्यातील अनेकांकडून अर्ज आले आहेत. मात्र, यातील एकही गाव वा वाडीसाठी अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. अशातच जिल्ह्यातील पाणीटंचाई भासत असलेल्या तुळशीकुब्जवाडी आणि खवटी धनगरवाडीला पिण्याचे पाणी देण्यास जिंदल कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या सहकार्याने या दोन वाड्यांवरील पाण्याचे दुर्भिक्ष्य वर्षभरातच कायमस्वरूपी निकाली निघण्यास मदत होणार आहे. विहिरी बांधतांना येणाऱ्या अडचणी कंपनी लिलया सोडवणार आहे. या दोन्ही वाड्या डोंगरात असल्याने टँकरमधून पाणी पोहोचविणे अशक्य होत आहे. त्यामुळे आता थेट गावातच या विहिरी बांधण्यात येणार आहेत. याकरिता आवश्यक तो निधी कंपनी खर्च करणार आहे. कंपनीने या दोन वाड्यांसाठी विहिरी बांधून दिल्यानंतर वस्तीची पाणी समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)