वेरळमध्ये विहिरीसाठीच्या सुरुंगामुळे घराला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 01:59 PM2021-03-05T13:59:06+5:302021-03-05T14:02:54+5:30
Lanja Ratnagirinews-लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे शेजारील घरांना तडे जात असल्याची तक्रार महंमद फकी यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
लांजा : तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे शेजारील घरांना तडे जात असल्याची तक्रार महंमद फकी यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
तहसीलदार समाधान गायकवाड यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वेरळ येथील आपल्या मिळकतीत पूर्वी जुनी विहीर होती. सन २०१९ मध्ये ग्रामपंचायत वेरळ यांनी या विहिरीचे नवीन बांधकाम दाखवून निधी खर्ची घातला. त्याबाबत आपण दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्रामपंचायत वेरळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. त्यानंतर दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमार्फत नळपाणी योजनेतंर्गत विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले.
त्याबाबत आपण वेरळ ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर केवळ दोन ते तीन दिवस काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दि. १५ फेब्रुवारीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटदाराने विहिरीत सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपले घर या विहिरीजवळ आहे. घरात वयोवृद्ध आई, छोटा मुलगा, भाची आणि मी राहतो. विहिरीत लावण्यात येणाऱ्या सुरूंगामुळे माझ्या घराला हादरे बसत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे आपले घर राहण्यासाठी धोकादायक बनले आहे.
याबाबत दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ग्रामपंचायत सरपंच यांना भेटून सुरूंगामुळे घराला तडे जात असल्याचे सांगून काम थांबवावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी या घराची पाहणी करून भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.
आधी स्फोट थांबवा
ग्रामसभेतही आपण हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही विहिरीत सुरूंग लावण्याचे काम सुरूच असल्याने माझ्या घराला तडे जाऊन आमच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला नुकसान भरपाई मिळावी आणि विहिरीत लावण्यात येणारे सुरुंगाचे काम ताबडतोब थांबविण्यात यावे अशी मागणी महंमद फकी यांनी केली आहे.