पूर्वी तुरे यांच्या सुसाइड नोटमुळे गुंता वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:24+5:302021-03-31T04:32:24+5:30
पूर्वी तुरे यांनी २६ मार्च रोजी मुरुड येथील टपाल कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या पर्समध्ये त्यांनी पतीला ...
पूर्वी तुरे यांनी २६ मार्च रोजी मुरुड येथील टपाल कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या पर्समध्ये त्यांनी पतीला उद्देशून लिहिलेले एक पत्र सापडले आहे. आपल्या माहेरच्या मंडळींना अंत्यसंस्कारासाठी बोलावू नका, असे त्यात त्यांनी लिहिले आहे. त्यांनी प्रेमविवाह केल्यानंतर गेली पाच वर्षे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माहेरच्या मंडळींशी त्यांचा अबोला होता. मात्र त्यांनी आपला संसार व्यवस्थित सुरू ठेवला होता.
ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली, त्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता त्या मुरुड येथे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या. दुपारी त्या हर्णै येथे घरी आल्या होत्या. दुपारी पतीसोबत त्यांची भेटही झाली होती. त्यानंतर पती हर्णै येथील पोस्ट कार्यालयामध्ये ड्यूटीवर निघून गेले आणि पूर्वी आपल्या मुरुड येथील कार्यालयात निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्यासारखे काय घडले, याची माहिती अजूनही उलगडलेली नाही.
पूर्वी तुरे यांनी हर्णै येथील एका दुकानात नायलॉनची दोरी खरेदी केली असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे त्यांनी आधीच निश्चित केले होते, असा अंदाज पाेलिसांनी लावला आहे. मात्र त्यामागचे कारण अजूनही स्पष्ट होत नसल्याने पोलिसांसमोरील गुंता वाढला आहे.