चिंचघरीतील तरुणाचा अडरे धरणात बुडून मृत्यू
By admin | Published: July 16, 2017 06:04 PM2017-07-16T18:04:02+5:302017-07-16T18:04:02+5:30
अडरे धरणात मित्रांबरोबर पोहायला गेल्याची शक्यता
आॅनलाईन लोकमत
चिपळूण (जि. रत्नागिरी), दि. १५ : चिपळूण तालुक्यातील चिंचघरी - गणेशवाडी येथील तरुणाचा अडरे धरणात बुडून मृत्यू झाला आहे. या तरुणाचा मृतदेह सकाळी ६ वाजताच्या दरम्यान सापडला.
चिपळूण तालुक्यातील चिंचघरी - गणेशवाडी येथील गणेश कृष्णा चाळके (२८) हा दि. १३ जुलैपासून बेपत्ता झाला होता. या तरुणाचे कपडे व छत्री अडरे धरणाच्या भिंतीवर आढळून आले होते. त्यामुळे हा तरुण अडरे धरणात मित्रांबरोबर पोहायला गेल्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, त्याचा मृतदेह शनिवारी धरणात आढळून आला.
जांभळाची फांदी पडून महिला जखमी
चिपळूण (जि. रत्नागिरी), दि. १५ : शहरातील गोवळकोट रस्त्यालगत मच्छीमार्केट जवळील पटेल सॉ मिल येथील जांभळाच्या झाडाची फांदी तुटून पडल्याने तेथे व्यवसाय करणाऱ्या चार महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.
शहरातील मच्छीमार्केटजवळील जांभळाच्या झाडाची फांदी अचानक तुटल्यामुळे त्याबरोबर विद्युतताराही तुटल्या. त्यानंतर शॉर्टसर्किट झाल्यामुळे परिसरातील वीजप्रवाह खंडित करण्यात आला. नागरिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या फांदीखाली अडकलेल्या जबीन मिरकर, मिनाज हमदुले, फरीदा जांभारकर, सुरैया जांभारकर या महिलांना बाहेर काढण्यात आले. स्थानिक नगरसेवक कबीर काद्री व त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोहोचले. नगर परिषदेला कळविल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत तातडीने तुटलेली फांदी बाजूला केली. त्यानंतर परिसराचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
गेले दोन दिवस चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही किरकोळ पडझडी होत आहेत. यामध्ये सरासरी पाऊस ७७.६६ मि. मी. तर आजअखेर १७५०.६५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
महिलेने ठोकले हायस्कूलला कुलूप
खेड : तालुक्यातील मांडवे येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेला गावातीलच संगिता सचिन मोरे या महिलेने शुक्रवारी सकाळी कुलुप ठोकले आहे. हे कुलूप अद्यापही काढण्यात न आल्याने गेले दोन दिवस ही शाळा बंदच आहे. याप्रकरणी संगिता मोरे हिच्यावर खेड पोलीस स्थानकात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम भगवंत मोरे यांनी त्यांचा मुलगा सचिन मोरे याला या हायस्कूलमधे शिपाई पदावर नोकरी देण्याच्या अटीवर आपली जागा दिली आहे. त्याप्रमाणे त्यांचा मुलगा सचिन मोरे याला नोकरीत सामावून घेण्यात आले. मात्र, सचिन याने २०१३मध्ये आत्महत्त्या केली. त्यामुळे पतीच्या जागी आपल्याला नोकरी मिळावी, अशी तिने नवजीवन शिक्षण संस्थेकडे मागणी केली. परंतु, संस्थेने नोकरी दिली नाही. त्याच रागाने शाळेला संगिता मोरे हिने कुलूप ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.