कासवाची पिल्ले समुद्राकडे झेपावली
By Admin | Published: February 2, 2016 11:20 PM2016-02-02T23:20:47+5:302016-02-02T23:20:47+5:30
राजापूर तालुक्यातील पहिलीच घटना : वन विभागाने केले संरक्षण
रत्नागिरी : माडबन (ता. राजापूर) येथील समुद्रकिनारी वन विभागाने ५५ दिवस संरक्षित केलेल्या कासवांच्या ७५ पिलांना सोमवारी किनाऱ्यावर सोडले. काही वेळातच ही पिल्ले सागराच्या दिशेने झेपावली.
माडबन सागर किनारी ९ डिसेंबर २०१४ रोजी वन विभागाला कासवांची १२४ अंडी आढळली. विभागाने संरक्षक रचना करून वाळूमध्ये खड्डा केला व अंड्यांना त्यात सुरक्षित ठेवले. अंड्यातून पिल्लेबाहेर येण्याच्या कालावधीत या भागातील काही ठिकाणची वाळू हलकी होऊन छोटे छोटे खड्डे निर्माण झाले. त्यामुळे पिल्लेबाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे लक्षात येताच वन विभागाने या ठिकाणी श्वान, कोल्हे या प्राण्यांपासून या पिलांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर टोपले ठेवले. त्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच ग्रामस्थ तसेच इतर सरकारी यंत्रणांचेही लक्ष होते.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास राजापूर वन विभागाला पिल्ले अंड्यातून बाहेर आल्याचा फोन आला. ताबडतोब विभागीय वन अधिकारी विजय जगताप आणि रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक सागर गोसावी आणि इतर कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. त्याचबरोबर माडबनचे पोलीसपाटील शामसुंदर गवाणकर, सरपंच योगेश वाघधरे, ग्रामसेवक वर्षा राणे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
उन्हाच्या आधी या पिलांना समुद्रात सोडणे गरजेचे होते. संरक्षित केलेल्या ठिकाणी आज ७५ पिल्लेआढळली. या पिलांना समुद्राकडे वळवण्यात आले. थोड्याच वेळात ही पिल्लेसागराकडे झेपावू लागली. यावेळी साऱ्यांच्याच चेहऱ्यावर अवर्णनीय असा आनंद दिसून येत होता.
कासवांच्या पिल्लांचे संवर्धन करण्याची राजापूर तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याचे रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी बी. आर. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)