सब घोडे बारा टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:18+5:302021-04-29T04:23:18+5:30

एकाने सांगितले... अहो दोन आठवड्यापूर्वी लस घ्यायला गेलो होतो, तर नर्स म्हणाली, तुम्ही ४५ च्या आतले दिसता. नंतर ...

Twelve percent of all horses | सब घोडे बारा टक्के

सब घोडे बारा टक्के

Next

एकाने सांगितले... अहो दोन आठवड्यापूर्वी लस घ्यायला गेलो होतो, तर नर्स म्हणाली, तुम्ही ४५ च्या आतले दिसता. नंतर या. माझ्या पत्नीने ही गोष्ट इतकी मनावर घेतली की, माझा हेअर डाय, दाढीचे सामान, संतुर साबण, फेसवॉश सगळं दडवून ठेवलं आणि काल गेलो तर नर्स म्हणाली, बाबा, खूप वेळ लावला हो... तेव्हा पत्नीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला, तो पाहून वाटलं, कारण नसताना आपण लग्न करून प्रतिस्पर्धी घरात आणला.

दुसऱ्याने सांगितले... या बायकोमुळे स्मार्ट फोनवरून बटणाच्या फोनवर आलो राव! आम्ही आश्चर्याने म्हणालो, चांगली गोष्ट आहे, तुमची बायको काटकसरी आहे. कसली राव काटकसरी, तिने माझ्या स्मार्ट फोनमधील ट्रु कॉलरवरील कॉल हिस्ट्री शोधून काढली आणि माझ्याकडे गुन्हेगारासारखी पाहत म्हणाली, हिस्ट्री शोधली, आता काही सापडलं नाही. पण पुढे-मागे जर काही सापडलं, तर कच्चा खाईन आणि माझ्या हातात बटणाचा फोन दिला. काय बोलावे सांगा? आम्ही तर हे ऐकून बधिरच झालो.

तिसऱ्याने सांगितले... चहा घेताना कप खाली पडत होता, म्हणून मी पकडला आणि म्हणालो, वाचला. त्यावर मोठे डोळे करून माझी बायको म्हणाली, वाचला नाही, वाचलास. काय राव, त्या ‘स’ने अशी दहशत घेतलीय की, मला काही सुचायचं बंद झालंय. त्यावर काही उपाय सांगा.

चौथा म्हणाला... अहो, लग्न झाल्यापासून आमच्या घरी रोजच धिंगाणा आहे. परवा ती म्हणाली, आमच्या गावी पहिला रेडिओ आमच्या पप्पांनी आणला होता. माझे पप्पा ग्रेट होते. मी आपला सहज म्हणालो हो, देवाशपथ मनात काही नव्हतं. स्वतःच्या आईबद्दल असं बोलू नये आणि राव जो धिंगाणा सुरू झालाय, परवापासून उपाशी आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर जेवायला जाता येत नाही आणि घरात वाढत नाहीत. काय करू सांगा?

हे सगळं चाललं असताना आमच्या सौभाग्यवती मागे कधी थांबल्या होत्या कळलंच नाही. वीज कडाडल्यासारख्या म्हणाल्या, हेच चालतं वाटतं तुमचं फोनवर? कोणाची बायको काय करते आणि तिचा नवरा काय करतो ते ! या नस्त्या भानगडी कशाला हव्यात? त्या बंडोपंत भाऊजींच्या नादाला लागून तुमचं डोकं पार बिघडून गेलंय. आणा तो मोबाईल इकडे. आजपासून मोबाईल बंद. उद्या त्यांच्या बायकांशी बोलाल. पुरुषांचा काय भरोसा? जळ्ळं मेलं, उगीच लग्न केलं तुमच्याशी. त्यापेक्षा तशी राहिली असती तर बरं झालं असतं.

आम्ही तर या दहशतवादी हल्ल्याने पार चितपट झालो. पण चेहऱ्यावर उसना जोर आणून म्हणालो, आम्ही संशोधन करतोय, लग्न करून माणसं कशी आहेत ते पाहायला. तशा सौभाग्यवती कडकडल्या... लग्नाआधी सोळा सोमवार उपवास करून तुम्हासारखा माणूस पदरात पडला. तेव्हापासून उपवासावरचा आणि तुम्हासारख्या नवरेमंडळींवरचा पार विश्वास उडालाय. आम्ही हे ऐकून पार भेदरून गेलो. सब घोडे बारा टक्के. मतितार्थ एकदम बरोबर.

- डॉ. गजानन पाटील

Web Title: Twelve percent of all horses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.