दापोलीत आढळले वीस जिवंत गावठी बॉम्ब, सापळा रचून पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या
By मनोज मुळ्ये | Published: June 16, 2023 06:09 PM2023-06-16T18:09:33+5:302023-06-16T18:10:09+5:30
या प्रकरणाचा अधिक तपास पाेलिस करत आहेत
शिवाजी गोरे
दापोली : जंगलातील शिकारीसाठी बनविण्यात आलेले गावठी बाॅम्ब विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला दापाेली पाेलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईत पाेलिसांनी २० जिवंत गावठी बाॅम्ब जप्त केले असून, एकाला अटक केली आहे. रमेश वसंत पवार (५०, रा. जामगे, नवानगर ता. दापोली) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई १५ जून राेजी सायंकाळी ४:१५ वाजता पालगड तिठा (ता. दापाेली) येथे करण्यात आली.
पालगड तिठा येथे एक व्यक्ती गावठी बॉम्ब विक्री करिता घेऊन येणार असल्याची माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंगरक्षक पोलिस कॉन्स्टेबल रमेश तुकाराम बांगर यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली पोलिस पथक तयार करण्यात आले. पालगड तिठ्याच्या १०० मीटर अंतरावरील शिवराज ढाबानजीक सापळा रचण्यात आला.
सुमारे अर्ध्या तासानंतर एक व्यक्ती एका दुचाकीवरून आली व रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. त्याचा या पथकाला संशय आल्याने त्याला पकडले.
त्याची चाैकशी करून त्याची व त्याच्या गाडीची झडती घेतली असता डीकीमध्ये एक पिवळ्या रंगाची पिशवी मिळाली. त्या पिशवीमध्ये एका प्लास्टिकच्या निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये एकूण २० खाकी रंगाचे गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थ मिळाले. त्याच्याकडून पाेलिसांनी २० गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थासह एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्याच्यावर दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाेलिस करत आहेत.
ही कारवाई बाणकाेट सागरी पाेलिस स्थानकाचे पाेलिस काॅन्स्टेबल रमेश बांगर, हेडकॉन्स्टेबल एम. एच. केतकर, पाेलिस काॅन्स्टेबल व्ही. आर. पाटील, मंडणगडचे पाेलिस काॅन्स्टेबल एस. आर. घाडगे यांनी केली.