Ratnagiri: वडिलांचा मृतदेह घरात ठेवून 'त्या' दोघी परीक्षेला, संगमेश्वर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:53 PM2024-03-29T17:53:37+5:302024-03-29T17:54:11+5:30
रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळच
मिलिंद चव्हाण
आरवली : दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचे शुक्रवारी (२२ मार्च) रात्री आकस्मिक निधन झाले. दुसऱ्या दिवशी इतिहासाचा पेपर हाेता. एकीकडे दु:खाचा डाेंगर हाेता तर दुसरीकडे शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा हाेता. अचानक समाेर आलेल्या या संकटाने दाेघीही हादरल्या. तरीही घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दाेघींनी दुसऱ्या दिवशी परीक्षाही दिली. ही घटना रांगव कुंभारवाडी (ता. संगमेश्वर) येथील आहे.
तन्वी व जान्हवी दीपक कुंभार या जुळ्या बहिणी दहावीला आहेत. इतिहासाचा पेपर असल्याने दोघी २२ राेजी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. अभ्यास पूर्ण होताच झोपण्याची तयारी सुरू असतानाच वडील दीपक कुंभार (४२) यांच्या छातीत दुखू लागले, त्यांना श्वास घ्यायला अडचण येऊ लागली. इतरांच्या मदतीने रात्रीच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्याेत मालवली आणि दाेघींसमाेर संकट उभे राहिले.
वाडीतील काही जाणकार मंडळींनी त्यांना विश्वासात घेऊन पेपरला जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी केली. काकी व इतर व्यक्तींना सोबत घेऊन त्या कडवईतील भाईशा घोसाळकर हायस्कूल केंद्रावर परीक्षेसाठी आल्या. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते, रडून आवाज क्षीण झाला होता. अशा मन:स्थितीत चार किलोमीटर प्रवास करून त्यांनी इतिहासाचा पेपर दिला.
रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळच
रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून त्या रडत होत्या. रात्र संपली दिवस उजाडला मात्र इतिहासाचा पेपर आणि घरी वडिलांचा मृतदेह या द्विधा मन:स्थितीत मुली वडिलांना सोडण्यास तयार नव्हत्या. आपले वडील कधीच आपल्याला दिसणार नाहीत की सोबत असणार नाहीत, त्यांचा आधार आता कायमचाच निघून जाणार, या अस्वस्थ भावनेने दाेघींनी टाहो फोडला.
मिळेत ते काम, देतील ते दाम
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाखीची आहे. नावालाच जमीन असल्याने उत्पन्नापेक्षा कसायला खर्च जास्त असल्याने शेती सोडली. त्यामुळे मिळेल ते काम आणि देतील ते दाम या न्यायाने वडील काम करून आपला संसार चालवत होते. मिळवणारा हात एक, मात्र कुटुंबात सात जण, त्यातच चार मुली, आई सोबत पत्नीची साथ होती.
माेठ्या मुलीने शिक्षण साेडले
मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाबरोबर कुटुंब सांभाळताना वडिलांना तारेवरची कसरत करावी लागत हाेती. त्यामुळे मोठ्या मुलीने शिक्षण अर्धवट सोडून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी धरली. तर लहान मुलगी आठवीला आहे.