अडीच वर्षांचा पाठपुरावा आला कार्मी...
By Admin | Published: December 17, 2014 09:43 PM2014-12-17T21:43:17+5:302014-12-17T23:02:25+5:30
चिपळूण तालुका : पाणी योजना जमा-खर्चाची फाईल सुपूद
अडरे : चिपळूण तालुक्यातील कामथे ग्रामपंचायत पाणी योजनेच्या जमा - खर्चाची फाईल ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळविण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या कार्यकारिणीच्या प्रयत्नाला यश आले आहे.
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत झालेल्या पाणी पुरवठा कमिटीचे माजी अध्यक्षांकडून प्राप्त झालेली फाईल सभापती, उपसभापती, गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली. या योजनेच्या करण्यात आलेल्या आॅडीटमध्ये आक्षेप नसला तरी ग्रामपंचायत पुनश्च: त्याचे आॅडिट करणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करु, असे सांगण्यात
आले.
चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सोमवारी छत्रपती सभागृहात झाली. या सभेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या पाणी योजनेच्या जमा - खर्चाची फाईल निवडणुकीनंतर नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीच्या ताब्यात देण्यात आलेली नव्हती.
ही फाईल नसल्याने पाणी पुरवठ्यासंदर्भात अनेक अडचणी येत होत्या. ग्रामपंचायतीने वेळोवेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्याला यश येत नव्हते. पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेकवेळा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अखेरीस ग्रामपंचायतींच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यासंदर्भात पाणी पुरवठा समितीचे माजी अध्यक्ष किसन माटे याना ही फाईल सुपूर्द करण्याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र, याबाबत पुढे कोणतीच कार्यवाही झाली नव्हती. अखेर हा प्रश्न सुटला असून ही फाईल ग्रामपंचायतीला मिळाली आहे.
अखेर पाणी योजनेच्या हिशोबाची फाईल मिळाल्याने या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)