ऑनलाइन गंडा घालणारे पुण्यातील दाेघे ताब्यात
By मनोज मुळ्ये | Published: December 15, 2023 10:59 PM2023-12-15T22:59:27+5:302023-12-15T23:00:01+5:30
या प्रकरणी रत्नागिरी पाेलिसांनी पुण्यातील दाेन भामट्यांना ताब्यात घेतले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : गुंतवलेली रक्कम ७ पटीने नफा देऊन परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल ६२ लाख ४६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला होता. या प्रकरणी रत्नागिरी पाेलिसांनी पुण्यातील दाेन भामट्यांना ताब्यात घेतले आहे.
संजय आण्णासाहेब कांबळे (४४, मूळ रा. संगमनेर, अहमदनगर सध्या रा. खेड, पुणे) आणि सोमनाथ चांगदेव सातपुते (४०, मूळ रा. संगमनेर, अहमदनगर सध्या रा. खेड, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात समीर सुरेश प्रसादे (४२, रा. सिद्धीविनायक नगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार, संशयितांनी संगनमताने फिर्यादीला वेल्थ पासवर्ड ३१४१ या व्हॉट्सॲप ग्रुपवर समाविष्ट करुन घेतले होते. या ग्रुपवर वेब वर्जन ॲण्ड्रॉईड डाउनलोड ही नाेंदणी लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यास सांगितले हाेते. प्रसादे यांनी त्यांची पत्नी सिया प्रसादे यांच्या नावे कंपनीचे ट्रेडिंग अकाउंट ओपन केले.
त्यानंतर त्यांना गुंतवलेली रक्कम ही ७ पटीने नफा देऊन परतावा दिली जाईल, असा प्लॅन त्यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या लिंकचा वापर करुन फिर्यादीची पत्नी सिया प्रसादे यांच्या बँक खात्यावरुन आरोपींना युपीआयआयडी आयएमपीएस तसेच बचत खात्यावर वेळोवेळी असे एकूण ६२ लाख ४६ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर केले. परंतु, त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दिली होती. या प्रकरणी तपास करताना शहर पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची रवानगी २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे.