रत्नागिरीतील घरफोडीप्रकरणी दाेघांना अटक, २६ ताेळे साेने हस्तगत
By अरुण आडिवरेकर | Published: March 31, 2023 01:56 PM2023-03-31T13:56:43+5:302023-03-31T13:57:04+5:30
रत्नागिरी शहर पोलिस स्थानक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातर्फे या प्रकरणाचा तपास सुरू हाेता
रत्नागिरी : शहरातील मांडवी राेड येथील घरकूल अपार्टमेंटमधील घरफाेडीप्रकरणी दाेघांना पाेलिसांनी २५ मार्च राेजी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ३० हजार रुपयांचे २६ ताेळे साेने आणि राेख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा तिसरा साथीदार अजूनही फरार आहे. या चाेरीतील दागिने चाेरट्यांनी शेजारील जिल्ह्यातील एका साेनाराच्या दुकानात विकल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे.
ही चाेरी २७ जानेवारी २०२३ राेजी घडली हाेती. रत्नागिरी शहर पाेलिस स्थानक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने या चाेरीतील चाेरट्यांना अटक केली. मांडवी रोड येथील घरकूल अपार्टमेंटमधील एका घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून बेडरुममधील एकूण २६ तोळे सोने व ३० हजार रोख रक्कम चोरण्यात आली होती. रत्नागिरी शहर पोलिस स्थानक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातर्फे या प्रकरणाचा तपास सुरू हाेता.
या गुन्ह्यामध्ये एका संशयित महिलेसह एकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते. त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता दागिने शेजारील जिल्ह्यातील साथीदाराच्या मदतीने एका सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे २७ मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील तपास पथकाने शेजारील जिल्ह्यात जाऊन गुन्ह्यातील तिसऱ्या संशयिताचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.
परंतु, गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने विक्री केलेल्या सोनाराचे दुकान दाखविले. या सोनाराकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या दाेघांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या महिलेच्या, (शेजारील जिल्ह्यामधील) अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
ही कामगिरी पाेलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, हेड काॅन्स्टेबल प्रसाद घोसाळे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, पाेलिस नाईक संकेत महाडिक, मनोज लिंगायत, आशिष भालेकर, पंकज पडेलकर आणि विनय मनवल यांनी बजावली. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.