Ratnagiri: घरात गांजा विक्री करणाऱ्या दोघा सख्या भावांना अटक
By संदीप बांद्रे | Published: November 16, 2023 07:00 PM2023-11-16T19:00:26+5:302023-11-16T19:01:30+5:30
चिपळूण : सावर्डे मोहल्ला येथे घरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन सख्या भावांना सावर्डे पोलिसांनी अटक केली. ...
चिपळूण : सावर्डे मोहल्ला येथे घरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन सख्या भावांना सावर्डे पोलिसांनी अटक केली. यासीन काद्री आणि गुलाम काद्री अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून अर्धा किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार सावर्डे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जयंत गायकवाड यांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली आहे. सावर्डे परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी परराज्यातील अनेक कामगार या परिसरात राहतात. त्यांच्यापैकी काहीजण अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांना आढळले होते. पोलिसांनी त्यांच्यावर तसेच अमली पदार्थ पुरवणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई केली होती. काही दिवसानंतर पुन्हा अमली पदार्थाची खरेदी विक्री सुरू होऊ नये यासाठी सावर्डे पोलिस संशयितांवर सातत्याने नजर ठेवून होते.
दोन दिवसापूर्वी यासीन महामुद काद्री (वय ६०, रा. सावर्डे अडरेकर मोहल्ला) हा गांजाचे सेवन करताना पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर दोघा सख्खा भाऊ गुलाम काद्री दोघे अमली पदार्थ विकत असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला असता सुमारे ७०० ग्रॅम गांजा सापडला. सावर्डे पोलिसांनी यासीन आणि गुलाम काद्री यांना अटक केली.