विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू
By admin | Published: September 25, 2016 01:00 AM2016-09-25T01:00:04+5:302016-09-25T01:00:04+5:30
ओसरगाव येथील घटना : वीज कंपनीकडून ६ हजारांची तातडीची मदत
कणकवली : ओसरगाव येथे विजेच्या तारांचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या दोन बैलांच्या मालकाला वीज वितरणच्यावतीने ६ हजारांची तातडीची मदत केली. साहायक अभियंता डांगी यांनी प्रभाकर सावंत यांच्याकडे मदत सुपूर्त केली. वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे बैलांचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ओसरगाव - कांसाळीवाडीतील प्रभाकर सावंत शनिवारी सकाळी आपल्या दोन्ही बैलांना चरण्यासाठी घेऊन जात होते. नेहमीच्या पायवाटेवरून जात असताना तुटून पडलेल्या प्रवाही विजेच्या तारांचा स्पर्श होऊन दोन्ही बैल जागीच मृत्यूमुखी पडले. तसेच विजेचा धक्का बसून सावंतही जखमी झाले. या घटनेनंतर पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. तातडीची मदत आणि नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सर्पे यांनी वीजवितरण अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वेर्लेकर यांनी घटनास्थळी जाऊन बैलांचे शवविच्छेदन केले.
दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे सावंत यांचे ७५ हजारांचे नुकसान झाले. तलाठी सिंगनाथ यांनी पंचनामा केला. वीजवितरणच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडली असून उपकार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. (प्रतिनिधी)