श्रमदानातून उभारले एका ओढ्यावर दोन बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 10:28 PM2016-06-13T22:28:30+5:302016-06-14T00:22:53+5:30

हरळीत ग्रामस्थ एकवटले : जलसंधारणाचा पहिला प्रयोग यशस्वी; पहिल्याच पावसात पाणीसाठा

Two bunds on a stretch raised from labor | श्रमदानातून उभारले एका ओढ्यावर दोन बंधारे

श्रमदानातून उभारले एका ओढ्यावर दोन बंधारे

Next

खंडाळा : पावसाळ्यात भरभरून वाहणारा ओढा मात्र बंधारा नसल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असते. गावच्या शिवारात पाणीपातळी वाढावी, पाण्याचा साठा शाश्वत निर्माण व्हावा. यासाठी ग्रामस्थांच्या सहभागाने तरुणांची शक्ती एकवटली आणि पाहता पाहता एकाच ओढ्यावर दोन बंधारे पूर्णत्वास गेले. लोकसहभागातून झालेल्या बंधारा निर्मितीमुळे पहिल्याच पावसात पाणी साठू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान पसरले आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत हरळी (ता. खंडाळा) येथे मांगदरा ओढ्यावर माती व दगड यांचा वापर करून दोन बंधारे बांधण्यात आले. ‘आपल्या गावाचा आपणच विकास करायचा’ हे धोरण ठरवून जलसंधारणाचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. खंडाळा येथील अष्टविनायक ग्लास कंपनीच्या सहकार्याने व ग्रामस्वराज्य संस्थेच्या मदतीने तरुणांचे शेकडो हात या कामासाठी राबले. बांधकाम व्यावसायिक नामदेव बरकडे, संतोष बरकडे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर अष्टविनायक कंपनीचे आदित्य अग्रवाल, सरपंच अवंतिका जावळे, ग्रामसेवक सुनील धायगुडे, सोमनाथ बरकडे, राहुल निकम, गणेश शिंदे, संतोष बरकडे, संतोष देशमुख, कृष्णा बरकडे, अक्षय निकम, अमोल बरकडे यांसह ५० ते ६० तरुणांनी सहभाग घेतला.
ओढ्याच्या पात्रातील गाळ काढून श्रमदानातून दोन बंधारे बांधल्यामुळे या परिसरातील शेतविहिरींची पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर पाणीटंचाईवरही मात करता
येणार आहे. जलसंधारणाबरोबर गावातील इतर सामाजिक समस्यांसाठीही लोकांच्या सहभागातून मार्ग काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)


ओढ्यावर बंधारे बांधण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. त्याला ग्रामस्थांसह संस्थांनीही मदत केली. लोकसहभागतून आदर्शवत काम उभारू शकते. याचा धडा तरुणांनी घालून दिला आहे. या बंधाऱ्यामुळे पाणीसाठा वाढेल गावाला निश्चित फायदा होणार आहे.
- अवंतिका जावळे,
सरपंच

Web Title: Two bunds on a stretch raised from labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.