आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:45 IST2021-12-07T19:43:00+5:302021-12-07T19:45:36+5:30
अपघातात मृत झालेली चिमुकली बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत.

आयशर टेम्पोने ठोकरले, रस्ते कामगार मजुरांच्या दोन चिमुकल्याचा मृत्यू
राजापूर : राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे सागरी महामार्गावर टेम्पोने ठोकरल्याने दोन लहान मुलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बाकाळे येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांची ही मुले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत. याच अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
सागरी महामार्गावरून जैतापूरकडून देवगडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने बाकाळे येथील तीव्र वळणावर तीन ते चार जणांना ठोकरल्याची घटना घडली आहे. यामध्ये १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षांच्या एका गंभीर जखमी मुलीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातस्थळापासून काही अंतरावरच टेम्पो सोडून चालक पसार झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ नाटे सागरी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.