फुणगूस खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:56 PM2018-05-13T22:56:16+5:302018-05-13T22:56:16+5:30
देवरुख : भरतीच्यावेळी खाडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या पाचपैकी दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिघांना वाचविण्यात यश आले. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीतील कडेवठार येथे रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. प्रसन्न हेमंत रामपूरकर (वय १६), साहिल दिनेश सावर्डेकर (१४, दोघेही मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वी ही मुले वार्षिक पूजेनिमित्त फुणगूस चव्हाणवाडी येथे नातेवाईकांकडे आली होती. रविवारी या दोघांसह साहिल सावर्डेकर, साईराज कोंडविलकर, प्रथमेश दिनेश सावर्डेकर असे पाचजण फुणगूस खाडीपात्रात सकाळी १० वाजता पोहायला उतरले. यावेळी पाण्याचा
व भरतीचा अंदाज न आल्याने हे
पाचही जण बुडू लागले. ही माहिती कळताच खाडीकिनारी असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. या दरम्यान ही मुले पाण्यात बेपत्ता झाले होती. ही बातमी कळताच लगेच स्थानिक ग्रामस्थांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले. तर साहिल सावर्डेकर (१४) याचा मृतदेह दुपारी १ वाजता खाडीत शोधण्यात यश आले. फुणगूस खाडीजवळ धक्क्यापासून सुमारे १२ फूट लांब तळाशी येथे दुपारी २ वाजता प्रसन्न हेमंत रामपूरकर याचा मृतदेह सापडला.
या घटनेमुळे फुणगूस गावावर शोककळा पसरली आहे. स्थानिकांच्या बचाव मोहिमेमुळे व शोधकार्यामुळे अन्य तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. याबाबतची माहिती कळताच संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. झगडे, सी. पी. चव्हाण, वैभव नार्वेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. झगडे करीत आहेत.