कुंभार्ली येथे वाशिष्ठी नदीत दोन मुलं बुडाली; रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता
By संदीप बांद्रे | Published: July 9, 2023 11:07 PM2023-07-09T23:07:09+5:302023-07-09T23:07:58+5:30
चिपळूण शहरातील आठ मुले सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी गेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीतील वजहर याठिकाणी दोन मुले बुडाल्याची घटना रविवारी (९ जुलै) सायंकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. शोध मोहिमेसाठी एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे.
चिपळूण शहरातील आठ मुले सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यामध्ये इब्राहिम काजोरकर (गोवळकोट रोड), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट रोड), फरहान हिदायत पिलपिले (खाटीकअली चिपळूण), अली नियाज सनगे (बेबल मोहल्ला, चिपळूण), जहिद हनीफ खान (कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (भेंडी नाका चिपळूण), आतीक इरफान बेबल (बेबल मोहल्ला), अब्दुल कादीर नोशाद लसणे (जिव्हाळा सुपर बाझार शेजारी, चिपळूण) यांचा समावेश होता.
शिरगाव येथील वजहर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले. पावसाची मोठी सर आल्याने सहा जण एका झोपडीखाली जाऊन थांबले. याच दरम्यान आतिक बेबल व अब्दुल कादिर लसणे यांनी डोहात उडी मारली. त्यानंतर ते बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायतीमार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल व अब्दुल कादिर लसणे दोघेही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते.