राजापुरात पुन्हा दोन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:32 AM2021-03-18T04:32:06+5:302021-03-18T04:32:06+5:30
राजापूर : जिल्ह्यात अन्य तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असतानाच सलग चौथ्यांदा १०० टक्के कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या राजापूर तालुक्यात ...
राजापूर : जिल्ह्यात अन्य तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असतानाच सलग चौथ्यांदा १०० टक्के कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या राजापूर तालुक्यात मंगळवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह अॅक्टिव रुग्णांची संख्या तीन इतकी झाली आहे. मंगळवारी नव्याने आढळून आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे दोनिवडे गावातील किराणा दुकानदार असल्याची माहिती राजापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय साबळे यांनी दिली आहे.
राजापूर तालुका प्रारंभीपासूनच कोरोना संसर्गापासून काहीसा सुरक्षित तालुका म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत तीनवेळा तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या शून्य झाल्याने तालुका १०० टक्के कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात तालुक्यात सहा कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. यातील पाच रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले होते व एकाच रुग्णावर उपचार सुरू होते. पुढील दोन दिवसात तोही बरा होऊन घरी जाणार होता. मात्र त्याचवेळी नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
शासनाच्या नव्या निर्देशाप्रमाणे आरोग्य विभागाच्या आता व्यापारी, कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.
दोनिवडे गावातील एकूण १० जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील दोन किराणा दुकानदारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोनिवडे गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून, आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. या व्यापाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचेही स्वॅब तपासले जाणार असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
आतापर्यंत तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३९९ इतकी नोंदली गेली आहे. यातील ३७० जण उपचारानंतर पूर्ण बरे होऊन घरी गेले असून, १८ जणांचा दुदैवाने मृत्यू झाल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.